शशिकांत मोरे
धाटाव : रोहा कोलाड रस्त्यालगत एक्सेल नाक्यावर उघडी डीपी अक्षरशः धोकादायक ठरत आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण विभागाचे या परिसरात चक्क दुर्लक्ष होत असल्याने रस्त्यालगत व लोकवस्ती ठिकाणी धोकादायक घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न समोर येत आहे.
महावितरणने काही भागांमध्ये वीजप्रवाहासाठी भुयारी केबल टाकले आहेत, तर बऱ्याच ठिकाणी वीज प्रवाहासाठी ट्रान्सफार्मरखाली डीपी उभारण्यात आल्या आहेत. या डीपीतून उच्च दाबाच्या वीज प्रवाहाचा संचार होतो. अनेक ठिकाणी या डीपीला समोरील भागात झाकण नसल्याचे चित्र आहे तर काही ठिकाणी झाकण असतानाही ते लावण्याचे कष्ट कर्मचारी घेत नसल्याचे दिसते. अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या पावसाळ्यामुळे डीपीला झाकण नसल्याने पावसाचे पाणी आतमध्ये शिरण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने जिल्ह्यातील काही गावांमध्ये उभारलेल्या डीपीची दारं उघडी असल्याने ते धोकादायक ठरत आहेत. या ठिकाणी बस थांबा असल्याने प्रवासी वर्ग याठिकाणी उभा राहतो. तर यामध्ये काही शालेय विद्यार्थी, कॉलेज तरुण, तरुणीचा समावेश असतो. विशेष म्हणजे काही डीपी गावातील घराशेजारी, मैदानालगत आहेत. याकडे महावितरण कंपनीने लक्ष द्यावे,अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अनेकवेळा गावातील लहान बालकं डीपीजवळ खेळत असतात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. वीज प्रवाहासाठी असलेल्या डीपीची डागडुजी, दुरुस्तीकरिता महावितरण कंपनीने पुढाकार घेऊन भविष्यातील धोका टाळावा, अशी मागणी केली जात आहे.
दुरुस्तीसाठी टाळाटाळ
अनेकवेळा डीपीचे झाकण लावण्याचे कष्ट कर्मचारी घेत नाही. तर काही ठिकाणी डीपीचे झाकण तुटले अथवा नादुरुस्त असल्यास ते पुन्हा योग्य करण्याची जबाबदारी महावितरणची आहे. असे असताना ग्रामीण भागात ट्रान्सफॉर्मरच्या खाली उभारण्यात आलेल्या डीपी कधी सुरळीत होणार? जीवितहानी झाल्यानंतर महावितरण कंपनी कामाला लागणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे झाकण दुरुस्तीसाठी होत असलेली टाळाटाळ थांबावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.