पळ काढणाऱ्या दाम्पत्यांला रोहा पोलिसांकडून अटक
शशिकांत मोरे
धाटाव : रोह्यात सध्या चोरी, विनयभंग यासारख्या गुन्हेगारीच्या घटना ताज्या असतानाच रोहे पोलिस ठाणे हद्दीतील भागीरथीखार गोफण येथिल एक वृध्द महिलेची सोनसाखळी हिसकावून पळ काढण्याचा प्रकार घडला आहे. संबंधित महिलेने याठिकाणी आरडाओरडा केल्याने पोलिसांनी त्वरित नाकाबंदी करीत मोटरसायकलवरून चोरी करून पळून जाणाऱ्या दाम्पत्यांला ताब्यात घेतले. या घटनेमुळे महिला वर्गासह नागरिकांत चांगलीच खळबळ उडाली आहे.
रोहा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नीलिमा नारायण वरसोलकर (वय ६५, रा. भागीरथीखार ता. रोहा , जि.रायगड) या सुकी मच्छी विकण्याचा व्यवसाय करतात. दरम्यानच्या ठिकाणी एक दाम्पत्य स्कूटरवरून येऊन त्यांनी संबंधित महिलेकडून थोडी सुकी मच्छी विकत घेतली. याठिकाणी मच्छी विक्रेत्या महिलेने गळ्यात सोन्याची माळ घातल्याचे या दांपत्याने पाहिले आणि शेडसई बाजूकडे निघून गेले. काही वेळाने पुन्हा मागे फिरून त्यांनी हेल्मेट घालून तोंडाला रुमाल बांधून मच्छीविक्रेत्या वयोवृद्ध महिले जवळ येऊन तिच्या गळ्यातील ३ तोळ्याची सोन्याची साखळी (माळ) जबरदस्तीने हिसकावून तेथून रोहा शहराकडे पळ काढला. वृद्ध महिलेने याठिकाणी आरडाओरड केल्याने तेथील जागरूक नागरिकांनी त्वरित या घटनेची कल्पना रोहा पोलीस ठाणे येथे दिली. पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून खारी चेकपोस्ट येथे पोलीस अंमलदारांसह नाकाबंदी लावली. काही वेळातच पळ काढणारे जोडपे खारी चेकपोस्ट येथे आले असता नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र वेगाने गाडी पळवून ते दाम्पत्य तांबडी गावाकडे पळून गेले. त्याठिकाणी नाकाबंदी करणारे पो. ना. शिरसाठ, अनिल पाटील, अंगद गुट्टे, मुसळे व होमगार्ड यांनी त्यांचा दुचाकीवरून पाठलाग सुरू केला.
आपल्या पाठीमागे पोलीस लागल्याचे पाहताच दुचाकीवरून पळ काढणाऱ्या या दांपत्याने वेगाने गाडी पळविली, मात्र त्याच वेगाने पोलिसांनी पाठलाग करून अत्यंत चपळाईने त्यांना काही अंतरावरच रोखून ताब्यात घेतले आणि जबरदस्तीने खेचून घेतलेली गळ्यातली सोन्याची ३ तोळ्याची सोनसाखळी आरोपींकडून हस्तगत केली. पोलिसांनी ताब्यात घेतलेले हे दाम्पत्य मुंबई गोरेगाव येथील असून नितीन सुरेश गुंडीये (वय-३६) व मोहिनी नितीन गुंडिये (वय-३३)
अशी त्यांची नावे आहेत. एखाद्या फिल्मी स्टाईलप्रमाणे हा प्रकार घडल्याचे घडला. या घटनेमुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान हे दाम्पत्य चोरी करण्याअगोदर आपल्या दुचाकीचे नंबर प्लेट दुमडून ठेवायचे असे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित आरोपींकडून आणखी काही गुन्हे समोर येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
ताब्यात घेतलेल्या दाम्पत्याविरुद्ध रोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलिस अधिक तपास करीत आहेत.