पोलीस चोरट्यांच्या शोधात
अनंत नारंगीकर
उरण : पाणदिवे गावातील बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण ११ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. चोरट्यांचा हा धुमाकूळ सोमवारी (दि. ३१ ) रात्री ११ च्या सुमारास सुरू होता. या प्रकरणी नरेश पंढरीनाथ पाटील यांनी उरण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नरेश पाटील यांच्या बंद घरात घुसून चोरट्यांनी घरातील १ लाख रुपयांची रोकड व १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण ११ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
उरण तालुक्यात चोरट्यांनी पुन्हा एकदा आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्या संदर्भात उरण पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून त्यांनी जनतेला सावध राहण्याचे आवाहन केले आहे. त्यातच पाणदिवे गावातील नरेश पंढरीनाथ पाटील हे रहिवाशी आपल्या नातेवाईकांकडे सोमवारी (दि. ३१) कोप्रोली येथे आपले राहते घर बंद करून गेले होते. रात्री ११.३०च्या सुमारास आपल्या घरी नरेश पाटील व कुटुंब आले असता, त्यांच्या बंद घरातील दरवाजा उघडा तसेच घरातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले दिसून आले. घरातील कपाट उघडून कपाटातील सामान विखुरलेल्या अवस्थेत पडलेले निदर्शनास आले. तसेच १ लाखाची रोकड व १० लाख किंमतीचे मौल्यवान दागिने चोरीला गेल्याचे दिसून आले.
घटनेचे गांभीर्य ओळखून नरेश पाटील यांनी सदर घटनेची माहिती उरण पोलिसांना दिली. उरण पोलीसांनी तातडीने घटनास्थळी पंचनामे सुरू केले आहेत. एकंदरीत नरेश पंढरीनाथ पाटील यांच्या घरातून चोरट्यांनी १ लाख रुपयांची रोकड तसेच १० लाखांचे सोन्याचे दागिने असा एकूण ११ लाखांचा ऐवज लंपास केला असल्याचे दिसून येत आहे. उरण पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. तसेच ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे. बंद घरांतील चोर्यांचे प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोकड सुरक्षित ठिकाणी ठेवून काळजी घेण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी केले आहे. तसेच सदर चोरी संदर्भात उरण पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.