• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

तळाघर येथील स्वयंभू श्री महादेवाची यात्रा भक्तीभावाने पार पाडण्याचा निर्धार

ByEditor

Apr 1, 2025
रोहा तालुक्यातील ऐतिहासिक महादेवाच्या यात्रेचे रोह्याचे तहसीलदार किशोर देशमुख, पोलीस निरीक्षक मारुती पाटील यासह प्रशासकीय अधिकारी वर्गाला निमंत्रण देताना विठ्ठल मोरे, नथुराम माने, हरिश्चंद्र मोरे यासह इतर मान्यवर. (छाया : शशिकांत मोरे धाटाव)

आढावा बैठकीत नियोजनावर चर्चा

शशिकांत मोरे
धाटाव :
रोहा तालुक्यातील धाटाव विभागात ऐतिहासिक महत्त्व असलेली जिल्ह्यातील प्रसिद्ध तळाघर (रोहा) येथील स्वयंभू महादेवाची यात्रा अत्यंत शिस्तबद्ध, तितकीच भक्तिभावाने पार पडण्याचा निर्धार पंचक्रोशीतील ग्रामस्थ मुख्यतः तरुण कार्यकर्त्यांनी केला आहे. अखंड बहुजन समाजाचा सहभाग, लग्न सोहळा, आगळावेगळा रितीरिवाज असलेली श्री महादेवाची यात्रा रविवार ६ एप्रिल, सोमवार ७ एप्रिल रोजी होत आहे. श्री महादेव, पार्वतीचा विवाह सोहळा, दुसऱ्या दिवशी सबेना असा धार्मिक कार्यक्रम साजरा होणार आहे. याच यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी तहसीलदार रोहा यांच्या कदालनात आढावा बैठक पार पडली. बैठकीत आरोग्य, वीज, पाणी, प्रत्यक्ष कार्यक्रमातील नियोजन, गर्दी विचारात घेता पोलीस बंदोबस्त, स्वयमं सेवकांची जबाबदारी विषयांवर चर्चा करण्यात आली. यात्रा आपली आहे. उत्सवाची शान आहे. याच दृष्टीने पंचक्रोशीतील प्रत्येकाने सहभाग व आचारान करावे, शिस्तबद्ध भक्तीतून नियोजनाचा संदेश सर्वदूर जावे हेच अपेक्षित आहे. प्रशासन आपली जबाबदारी चोखपणे पार पाडेल असे मार्गदर्शन तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांनी केले.

तालुक्यातील ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या आगळीवेगळी बहुजन समाजाच्या विवाह प्रथा, पूजापाठ परंपरा जपणाऱ्या स्वयंभू महादेवाच्या यात्रेला दक्षिण रायगडातून महादेवाची काठी व भाविक मोठ्या प्रमाणात येतात. विवाह सोहळा पाहण्यासाठी, दर्शनासाठी अलोट गर्दी होते. धार्मिक विधी, मंगलाष्टके यांसह खारगांव येथील नवरदेव, धाटावची नवरी, करवली, करवले असा आकर्षक सोहळा साजरा होतो. अठरा पगड जातीचे बारा बलुतेदार यांचा सहभाग असतो. यात्रेत विविध प्रकारची दुकाने, पाळणे, करमणूक साधने असतात. हा भला मोठा सोहळा शांततेत पार पडण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली. तहसीलदार किशोर देशमुख, पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. बैठकीला नायब तहसीलदार राजेश थोरे, पुंडलिक मोकल, ओबीसीचे अध्यक्ष सुरेश मगर, कुणबी समाजाचे उपाध्यक्ष शंकरराव भगत, आगरी समाजाचे अध्यक्ष हरिश्चंद्र मोरे, कुणबी समाजाचे विभाग अध्यक्ष दिनेश रटाटे, सरपंच रामा म्हात्रे, सरपंच नथुराम माने, बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, तळाघर समाजाचे अध्यक्ष हरिश्चंद्र माने, सुनील मोरे, जयवंत मुंढे, अमित मोहिते, रुपेश शिंदे, पत्रकार राजेंद्र जाधव, शशिकांत मोरे, सतीश भगत, ॲड. दीपक भगत, दगडू बामुगडे, महादेव लोखंडे, तळाघर यांसह पंचक्रोशीतील सर्वच गावांतील प्रमुख ग्रामस्थ, वीज वितरण, एमआयडीसी, आरोग्य विभाग, पंचायत समिती, ग्रामसेवक, तलाठी व अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

तालुक्यातील श्री महादेवाची यात्रा मोठी आहे. ऐतिहासिक वारसा आहे. अलौकिक परंपरा आहेत. याच दृष्टीने आपण तयारी करायची आहे. नियोजनात स्वयंसेवक शान असतात. याची जाणीव ठेवली गेली पाहिजे तसे मार्गदर्शन आपण करू, आपला कार्यक्रम आपणच शिस्तबद्ध करू यात अशी भावना पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी व्यक्त करत सर्वोतोपरी बंदोबस्त सहकार्य करण्याचे आश्वासित केले. यावेळी सुरेश मगर, शंकरराव भगत यांनी यात्रा परंपरा व नियोजनासबंधी माहिती दिली. दरम्यान, श्री महादेवाची यात्रा भक्तीभाव, उत्साहात साजरी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!