• Sat. Apr 5th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महावितरण कंपनीच्या पळपुट्या ठेकेदारामुळे विद्युत जोडणीचे काम रखडलं, जनतेत संतापाची लाट

ByEditor

Apr 4, 2025

अनंत नारंगीकर
उरण :
उरण पुर्व विभागातील सुमारे १७ गावांना सुरळीत विद्युत पुरवठा करण्यासाठी महावितरण कंपनीच्या माध्यमातून करोडो रुपये खर्च करून नव्याने विद्युत जोडण्याचे काम भेंडखळ ग्रामपंचायत ते खोपटा पुल या दरम्यान मंजूर करण्यात आले आहे. मात्र, सदर कामाचा ठेका घेणाऱ्या ठेकेदारानी अर्धवट काम टाकून पळ काढल्याने सदरचे काम हे मागील काही दिवसांपासून रखडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

उरण पुर्व विभागातील खोपटा, कोप्रोली, पिरकोण, आवरे, सारडे, वशेणी, पुनाडे, मोठी जुई, कळंबुसरे, चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील गावांना तसेच व्यावसायिक, गोदामांना महावितरण कंपनीच्या माध्यमातून विद्युत पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील खाडीतून येणारी विद्युत वाहक केबल सातत्याने तूटत असल्याने तसेच पावसाळ्यात त्यामध्ये बिघाड होत असल्याने महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी अनेक समस्यांचा सामना हा आपला जीव मुठीत घेऊन करावा लागत आहे. त्यामुळे रात्री अपरात्री सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने त्याचा त्रास हा नाहक रहिवाशांबरोबर, व्यावसायिकांना सहन करावा लागत असल्याने शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष ठाकूर व मनसेचे तालुकाध्यक्ष ॲड. सत्यवान भगत यांनी या संदर्भात अनेक वेळा पत्रव्यवहार करून नव्याने सुरळीत विद्युत जोडणीचे काम करण्याची मागणी केली.

उरणचे आमदार महेश बालदी यांनी सदर घटनेचे गांभीर्य ओळखून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नव्याने उरण पुर्व विभागासाठी विद्युत जोडणीचे काम मंजूर करून घेतले. सदर कामाचा ठेका घेणाऱ्या ठेकेदारानी महावितरण कंपनीच्या देखरेखीखाली विद्युत जोडणीचे काम सुरूही केले होते. मात्र करोडोचा ठेका घेणाऱ्या ठेकेदारानी भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील कोस्टल रोडवरच विद्युत जोडणीचे काम अर्धवट टाकून पळ काढल्याने सदरचे काम हे मागील काही दिवसांपासून रखडल्याचे चित्र दिसून येत आहे. तरी सदरचे काम पावसाळ्यापूर्वी पुर्ण करण्यात यावे अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे.

उरण पुर्व विभागात सुरळीत विद्युत पुरवठा करण्यासाठी महावितरण कंपनीच्या माध्यमातून नव्याने विद्युत जोडणीचे काम मंजूर करण्यात आले आहे. सध्या सदरचे काम करणारा ठेकेदार पळून गेल्याची बाब समोर येत आहे. तरी नव्या ठेकेदारांची नियुक्ती केल्यानंतर अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यात येणार आहे.
जयदीप नानोटे
अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण कार्यालय उरण.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!