पनवेल : बहुचर्चित पोलीस अधिकारी अश्विनी बिंद्रे अपहरण आणि हत्या प्रकरणात बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. महेश फळणीकर आणि कुंदनलाल भंडारी यांना पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोषी जाहीर करण्यात आले. मात्र याप्रकरणातील दोन क्रमांकाचा आरोपी ज्ञानदेव उर्फ राजू पाटील याला पुराव्या अभावी निर्दोष सोडण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील शुक्रवारी ११ एप्रिल रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. ९ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. याप्रकरणातील पोलिसांच्या भूमिका आणि कार्यपध्दतीवर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.
अश्विनी बिंद्रे यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यांची २०१५ मध्ये नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यात बदली झाली होती. मात्र त्या कंळबोली पोलीस ठाण्यात रुजू झाल्याच नव्हत्या. दीड वर्षांपासून त्या बेपत्ता होत्या. अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी कळंबोली पोलीस ठाण्यात अभय कुरुंदकर यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र पोलिसांनी कुरुंदकर यांच्यावर कारवाई केली नव्हती. यामुळे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले होते. उच्च न्यायालयाने अश्विनी बिंद्रे यांचा शोध घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.
११ एप्रिल २०१६ रोजी अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याचे उघड झाले होते. अनैतिक प्रेमसंबंधातून ही हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्याचा तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर मुख्य आरोपी होता. अश्विनी बिंद्रे हिची हत्या करून आपल्या साथादीरांच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. या याप्रकरणा अभय कुरुंदकर, ज्ञानदेव पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना अटक करण्यात आली होती. अश्विनी बिद्रे यांची हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह वसई खाडीत टाकण्यात होता. मात्र शेवटपर्यंत त्यांच्या मृतदेहाचे अवशेष सापडले नव्हते.
पनवेल येथील सत्र न्यायालयाचे शनिवारी अंतिम सुनावणी झाली. यावेळी न्यायालयात आरोपी व सरकारी पक्षाच्या वकिलांसह मोठ्या प्रमाणात गर्दी हो. न्यायाधिश कृ. प. पालेदवार यांच्या यांच्यासमोर सरकारी वकिलांनी तब्बल ८० विविध व्यक्तींची साक्ष नोंदवली. त्यानंतर शनिवारी न्यायालयाने या हत्या प्रकरणाचा निर्णय जाहीर केला. बिंद्रे यांच्या हत्या प्रकरणात अभय कुरुंदकर याला न्यायालयाने हत्या आणि कट रचण तसेच बिद्रे यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याप्रकरणी दोषी जाहीर केले. या प्रकरणातील क्रमांक २ चा आरोपी राजू उर्फ ज्ञानदेव पाटील याला दोष सिद्ध न झाल्याने दोष मुक्त करण्यात आल्याचे सुद्धा न्यायाधिशांनी सांगितले.
