रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते सन्मान
अब्दुल सोगावकर
सोगाव : अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील सर्वसामान्य जनमानसात ओळख असलेले सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांना ‘रायगड सन्मान सोहळा’ कार्यक्रमात ‘आदर्श सामाजिक कार्यकर्ता’ हा पुरस्कार रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याहस्ते व पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, सचिन फुलपगारे यांच्या उपस्थितीत शनिवार दि. २९ मार्च २०२५ रोजी पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात देण्यात आला.
या ‘रायगड सन्मान सोहळा’ कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सर्व पत्रकार व त्यांचे सहकारी यांचे कौतुक केले. तसेच सर्व पुरस्कार सन्मानार्थीचे त्यांनी केलेल्या कार्याचेही कौतुक केले. यावेळी महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे या नियोजित कार्यक्रमामुळे उशिरा कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित उपस्थित होत्या, यावेळी मंत्री अदिती तटकरे यांनी झालेल्या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांच्यासह सर्व विविध पुरस्काराने सन्मानित मान्यवरांची त्या त्या क्षेत्रातील केलेल्या कार्याची माहिती घेऊन उपस्थित सर्व पुरस्कार विजेत्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे जबाबदारी अधिक वाढली असल्याचे सांगितले. तसेच यासाठी आपण यापुढे अधिक उत्स्फूर्तपणे व अधिक जोमाने आपापल्या क्षेत्रात कार्य करावे, असे सूचित करत सर्व पुरस्कार सन्मानार्थीचें कौतुक व अभिनंदन केले.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी मिळालेल्या पुरस्काराबद्दल मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मी माझे सामाजिक कार्य हे माझ्या समाजासाठीच न करता सर्व समाजासाठी तसेच सर्व समाजांना व सर्वांना सोबत घेऊन करीत आहे. माझ्या सामाजिक व राजकीय विरोधकांनी माझ्यावर वारंवार केलेल्या टीकेमुळे मला अधिक प्रमाणात कार्य करण्याची प्रेरणा मिळाली, त्यामुळे मी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून माझे कार्य करण्याची जबाबदारी स्वीकारत ती पार पाडत आहे, मला मिळालेला सन्मान मी सर्वांनाच समर्पित करतो, तसेच मी विरोधकांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. येत्या काळात सर्व समाजातील सर्वांसाठी अधिक प्रमाणात सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक, कला, क्रीडा व इतर अनेक क्षेत्रात जास्तीत जास्त प्रमाणात कार्य करण्याचा माझा मानस आहे असे शेवटी सांगितले.
या कार्यक्रमाला रायगड जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेक मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सचिन घाडी यांच्या सोबत त्यांचे मोठे भाऊ रोहिदास घाडी, सतीश घाडी तसेच दिलीप मोंढे, सुधाकर ठकरुळ, दिपक सूद, नितेश ठकरूळ, आर्यन घाडी, पियुष घाडी तसेच इतर मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांना ‘रायगड सन्मान सोहळा’ कार्यक्रमात सलग दुसऱ्या वर्षी मिळालेल्या ‘आदर्श सामाजिक कार्यकर्ता’ या पुरस्कारामुळे त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होऊन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.