शशिकांत मोरे
धाटाव : रोहा शहरात बुधवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. आजीने चिमुकल्या नातवासह बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारत जीवन संपवले. टेरेसवरून खाली पडलेल्या आजीचा जागीच मृत्यू झाला तर १ वर्षीय चिमुकल्याचा अधिक उपचारार्थ पनवेलला नेत असताना वाटेतच मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. आजीने नातवासह बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी का मारली? याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. दुसरीकडे आजीच्या आत्महत्येचे नेमके कारण अजून समोर आलेले नाही. रोहा पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, आजी व नातू यांच्या मृत्यूच्या हृदयद्रावक घटनेने रोह्यासह सबंध जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. रोहा शहरातील सर्वांनीच आजी नातवाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली आहे.
रोहा कोलाड मुख्य रस्त्यावरील शहरातील ओम चेंबर्स बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या उर्मिला सिद्धीराज कोरे (वय ५१) ह्या आजीने आपल्या केवळ १ वर्षाच्या नातवासह बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारली. त्यात उर्मिला कोरे यांच्या मेंदूला मोठा मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नातू वेदांत भोगडे याला गंभीर दुखावत झाली. शासकीय रुग्णालयातून पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात अधिक उपचारार्थ नेत असताना अर्ध्या वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. या धक्कादायक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उर्मिला कोरे ह्या मानसिक तणावाखाली होत्या. वेळेत गोळ्या औषधे घेत नसल्याने त्यांचा आजार अधिक बळावला. याच मानसिकतेतून आजीने हे टोकाचे पाऊल उचलले नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेबद्दल अजूनही संभ्रम कायम आहे. आजीने नातवासमवेत आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत अधिक तपास रोहा पोलीस करत आहेत. आत्महत्येचा कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, आजी नातवाच्या मृत्यूने सर्वत्र एकच खळबळ उडाली. हृदयद्रावक घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस तपासातून आत्महत्येचे कारण लवकरच समोर येणार आहे.
