योग्य वैद्यकीय परवाने नसताना दवाखानेही जोरात सुरु
घनःश्याम कडू
उरण : उरण नगरपालिका हद्दीत अनेक बार नियमांचे उल्लंघन करत थेट रहिवासी इमारतींमध्ये सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे स्थानिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नियमांनुसार बार चालवण्यासाठी व्यावसायिक जागेची आवश्यकता असते. माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता नगरपालिका प्रशासन अधिकारी आमच्याकडे कोणतीही कागदपत्र नसल्याचे लेखी उत्तर देऊन अर्थपूर्ण संबंध जपत आहेत.
मात्र, काही बार रहिवासी भागात बेकायदेशीरपणे सुरू असून, तिथून येणार्या मोठ्या आवाजातील संगीत व मद्यपींच्या वर्तनामुळे रहिवाशांचे शांततेत जगणे अशक्य झाले आहे. काही ठिकाणी बार नियोजित वेळेनंतरही सुरू राहत असल्याच्या तक्रारी आहेत.
तसेच, काही दवाखाने योग्य वैद्यकीय परवाने नसताना, परवाना नसलेल्या डॉक्टरांच्या मार्फत चालवले जात आहेत. अरुंद आणि अपुर्या सुविधांच्या जागांमध्ये हे दवाखाने रुग्णांची सुरक्षितता धोक्यात घालून सुरू आहेत. औषध साठवणीसंदर्भातील नियमांचेही सर्रास उल्लंघन होत आहे. यावर नगरपालिका व आरोग्य विभागाने अद्याप ठोस पावले उचललेली नसल्याचे दिसून येत आहे. स्थानिकांनी दिलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असून, काही अधिकार्यांकडून या गैरव्यवहारांना पाठबळ दिले जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. स्थानिक नागरिक व सामाजिक संघटनांनी तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.