• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगावमधील भाजपचा नाराज गट शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात?

ByEditor

Apr 9, 2025

प्रतिनिधी
माणगाव :
तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचा नाराज गट शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती तालुक्यातील पक्षाचे ज्येष्ठ नेते यांनी आपले नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

याबाबत आमच्या प्रतिनिधीने त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली असता त्यांनी सांगितले कि, सन २०१४ च्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या आगोदर माणगाव तालुक्यात भाजप संघटन तेवढीशी मजबूत नव्हती त्याकाळात भाजप संघटन मजबूत करण्यासाठी आमच्यासारख्या अनेक जुन्या व वरिष्ठ नेते व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन संघटन वाढीच्या दृष्ठीने काम केले. केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोकाभिमुख योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याचे प्रामाणिकपणे काम करून संघटनेमार्फत विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविले. त्याचबरोबर तालुक्यात विविध ठिकाणी पक्षाचे पदाधिकारी नेमून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची सर्वत्र फळी उभी केली. यामुळे तालुक्यात भाजप संघटन मजबूत झाले.

सन २०१४ पासून ते २०२४ पर्यंत विधानसभा व लोकसभा तसेच विधान परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना निवडूण आणण्यासाठी तन, मन, धन लावून इमाने इतबारे काम केले. असे असतानाही आमच्यासारख्या तालुक्यातील अनेक जेष्ठ व अनुभवी नेते व कार्यकर्ते यांना संघटनेच्या कामातून डावलले जात आहे. पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना संघटनेच्या कोणत्याही कामाबाबत विश्वासात घेतले जात नाही. आमच्या मागून विविध पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांना संघटना बळ देत आहे. म्हणजेच पक्ष नेतृत्व यांनी आम्हाला बाजूला ठेऊन नवीन कार्यकर्त्यांकडे त्यांचे अधिकतम लक्ष आहे. नवीन लोकांमार्फत संघटनेचे काम केले जात आहे. या गोष्टींना गेल्या तीन वर्षांपासून आमच्यासारखी जुनी मंडळी कंटाळली असून आम्ही सारेजण नाराज आहोत. याकडे पक्ष नेतृत्व पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. नव्याची नवलाई हि काही दिवसांपुरतीच सीमित असते असे या नाराज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांजवळ बोलताना सांगून याची पक्ष नेतृत्वाने लवकरात लवकर दखल न घेतल्यास नाइलाजस्तव आम्ही लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!