• Sat. Apr 19th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

“गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रिपद मिळणार नाही”, अंबादास दानवे यांचा दावा

ByEditor

Apr 14, 2025

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पाकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरुन महायुतीत वादाची ठिणगी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. खरंतर जेव्हा पालकमंत्री पदाचे वाटप करण्यात आले होते, तेव्हा रायगडचं पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या अदिती तटकरे यांना आणि नाशिकचं पालकमंत्री पद भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलं होतं. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप देखील सुटलेला नाही. अशातच नुकतेच देशाचे गृहमंत्री अमित शाह हे रायगडच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल अशा चर्चा होत्या. मात्र, त्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचं बोललं जातं. दरम्यान, रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा मंत्री भरत गोगावले हे आग्रही आहेत, त्यांनी याबाबत अनेकदा इच्छाही बोलून दाखवली. मात्र, भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्रिपद मिळणार नाही”, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

मंत्री भरत गोगावले यांच्याबाबत बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांनी भरत गोगवले यांना भेटण्यासाठी बोलावून घेतलं असेल तर दुसरं काय? रायगडचं पालकमंत्रिपद. पण भरत गोगवले यांना रायगडचं पालकमंत्रिपद मिळेल असं मला वाटत नाही. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपावाले आता मोजत नाहीत. मंत्रिमंडळाच्या खाते वाटपावरून, अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून, आर्थिक अधिकारावरून हे दिसून येतं. सध्या शिवसेना (शिंदे) च्या सर्व खात्याचे सर्व निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेतात. उद्योग विभागाच्या मंत्र्यांना फक्त हात चोळत बसावं लागतं. त्यांचा एमडी त्यांचं ऐकत देखील नाही. एसटी विभागाचंही तसंच झालं आहे. अनेक खात्यांचं असंच झालंय. त्यामुळे एकनाथ शिंदे काहीही करू शकणार नाहीत”, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!