मुंबई : गेल्या १५ वर्षांहून अधिक काळापासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आता नवा मुहूर्त दिलाय. दादरच्या अमर हिंद मंडळाच्या ८७ व्या वसंत व्याख्यानमालेत ते | बोलत होते. गेल्या काही वर्षांत देशातील पायाभूत सुविधा आणि दळवळणामध्ये झालेल्या विकासाबाबत ते बोलत होते.
नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा महामार्गाचा विषय काढताच त्यांना स्वतःलाच हसू उमटले. | म्हणाले, “मुंबई-गोवा महामार्गासाठी खूप अडचणी आल्या, पण तुम्ही काळजी करू नका. या वर्षीच्या जूनपर्यंत हा रस्ता १०० टक्के पूर्ण होणार. हा रस्ता बराच रेंगाळला. दिल्ली-जयपूर आणि मुंबई-गोवा आमच्या विभागातील ब्लॅक स्पॉट्स आहेत. त्याच्या अडचणी खूप आहेत. कोकणातील सत्य सांगितलं तर तुम्हाला चालणार नाही. पण १४ ते १५ जण ३ एकर शेतीचे मालक. त्यांच्यात भावा-भावांमध्ये भांडणं. कोर्ट केसेस झाल्या. त्या जमिनीच्या मोबदला देता देता पुरेवाट लागली.पण समस्या सुटली आहे.”
मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर या ८४ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम २०१० साली सुरू झाले होते. १५व्या वर्षातही हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. दुसऱ्या टप्प्यातील इंदापूर ते झाराप या कामाला २०१४ मध्ये सुरुवात झाली ते २०१६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. २०२५ उजाडला तरी हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतेक कामे पूर्ण झाली असली तरी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील कामे रखडले आहेत.