महाड शहर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
मिलिंद माने
महाड : काही महिन्यांपूर्वी विनयभंग प्रकरणी तुरुंगाची हवा खाऊन आलेल्या एका विकृत मानसिकतेच्या तरुणाने पुन्हा एकदा दोन शाळकरी अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना सोमवारी महाड शहरामध्ये घडली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार दिनांक १४ एप्रिल रोजी दुपारी महाड शहरातील एका सोसायटीच्या पार्किंग मधील कार्यालयात या दोन अल्पवयीन मुली आपली शिकवणी संपवून काही कामानिमित्त गेल्या असता आरोपीत याने कार्यालयात घुसून या दोन्ही अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे करून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. सदर घटनेबाबत मुलींच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी ओंकार रजनीकांत रणदिवे, वय २७ राहणार महाड शहर याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७४,७५ (१), ७५ (२), ७६, ७९ त्याचप्रमाणे बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ७,८,११ (१),१२ नुसार कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचा अधिक तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेने महाड शहरात एकच खळबळ उडाली असून या विकृत मनोवृत्तीच्या आरोपीस कठोरात कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.