क्रीडा प्रतिनिधी
रायगड : महाराष्ट्र क्रिकेट अससोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एमसीए (पुरुष व महिला) टी -20 प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी रविवारी नागोठणे येथील रिलायन्स क्रिकेट मैदानावर रायगड रॉयल्स संघाच्यावतीने जिल्ह्यातील खेळाडूंसाठी निवड चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून 227 पुरुष खेळाडू व 40 महिला खेळाडूंनी शिबिरामध्ये सहभाग घेतला होता.
शिबिराचे उदघाटन विधानपरिषदेचे माजी आमदार अनिकेत तटकरे, आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक, सहसचिव जयंत नाईक, सदस्य समीर मसुरकर, रायगड रॉयल्स संघांचे कार्यकारी कमिटीचे सदस्य तथा संघ संचालक पराग मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी अनिकेत तटकरे यांनी मार्गदर्शनपर बोलतांना रायगड रॉयल्स संघांनी आपल्या जिल्ह्यातील गुणवान, युवा व होतकरू क्रिकेट खेळाडूंची संघात निवड करून त्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. रायगड जिल्हा क्रिकेट अससोसिएशन अनिरुद्ध पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत असल्याने येणाऱ्या काळात जिल्ह्यातील जास्तीतजास्त खेळाडू महाराष्ट्राच्या विविध वयोगटाच्या संघात स्थान मिळवताना नक्की दिसतील याची खात्री आपल्याला आहे. जिल्ह्यातील क्रिकेटच्या विकासासाठी आपण आरडीसीएला लागेल ती मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित टी-२० प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत रायगड रॉयल्स संघ चांगली कामगिरी करून अव्वल स्थान प्राप्त करावे ह्यासाठी संघ व्यवस्थापकांना तटकरे यांनी शुभेच्छा दिल्या. रायगड रॉयल्स संघांसाठी सिलेक्टर व संघांचे प्रशिक्षक म्हणून माजी रणजीपट्टू अनुपम संकलेचा, निखिल पराडकर, चारुदत्त कुलकर्णी, शिरीष कामथे, साहिल आगरकर, महिला क्रिकेटर विद्यमान भारतीय खेळाडू किरण नवगिरे, माजी भारतीय खेळाडू सोनिया डबीर यांनी संघ निवडकर्ता म्हणून काम पहिले तर शंकर दळवी, सुरेंद्र भातिकरे यांनी समन्वयक म्हणून योगदान दिले.