कामाची एकंदरीत परिस्थिती पाहता काम जूनपर्यंत पूर्ण होणे अशक्यच!
विश्वास निकम
कोलाड : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात अनेक अडचणी आल्या, पण काळजी करू नका येत्या जुन महिन्याअखेर या महामार्गाचे काम १०० टक्के पूर्ण होईल अशी नवीन डेडलाईन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दादरच्या अमर हिंद मंडळाच्या ८७व्या वसंत व्याख्यानमालेत बोलतांना दिली आहे. परंतु महामार्गाच्या एकंदरीत कामाच्या परिस्थितीवरून ही डेडलाईनही फेल जाणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया कोलाडवासियांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचा विषय काढल्यानंतर नितीन गडकरी हसले व पुढे म्हणाले, मुंबई गोवा महामार्गासाठी अनेक अडचणी आल्या यातून मार्ग काढत हे काम येत्या जुनपर्यंत पूर्ण होईल. काम बराच काळ रेंगाळलं असल्याची कबुली नितीन गडकरी यांनी दिली आहे. परंतु आता यावर जनतेचा विश्वास राहिला नाही. कारण २०१८ पासून या महामार्गाचे काम पूर्ण होण्याच्या अनेक डेडलाईन लोकनेत्यांकडून देण्यात आल्या असल्याचे लोकांनी पाहिले आहे. आता ही दिलेली डेडलाईन फेल जाणार असल्याचे दिसून येत आहे. याला कारण कोलाड आंबेवाडी बाजारपेठेतील उड्डाणपुलाचे काम अर्धवट स्थितीत असुन हा पुल पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागेल हे सांगता येत नाही असे एकंदरीत परिस्थितीवरुन दिसून येत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली १७ वर्षांपासून सुरु आहे. परंतु, किती ठेकेदार आले, किती गेले परंतु हे काम अद्यापही पूर्ण होऊ शकले नाही. याउलट अर्धवट कामामुळे या महामार्गांवर असंख्य अपघात झाले. अनेकांचे नाहक बळी गेले. याला जबादार कोण? अशी प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी अनेकांनी आपल्या जमिनी कवडीमोल भावाने दिल्या, एवढेच नाही तर अनेक बाजारपेठा उध्वस्त झाल्या. अनेक व्यावसायिकांना आपल्या व्यवसायावर पाणी सोडावे लागले, परंतु असे असले तरी महामार्गाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. मुंबई-गोवा महामार्गावरील आंबेवाडी येथील उड्डाणपुलाचे काम अद्यापही पूर्ण होऊ शकले नाही. तसेच या महामार्गांवरील पुई महिसदरा नदीवरील पुलाचे काम अजूनही अपूर्ण आहे. नागोठणे येथिल उड्डाणपुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे. तर काही रस्त्याची कामे अर्धवट स्थितीत आहेत. जुन महिना संपण्यासाठी अडीच महिने शिल्लक आहेत. यामुळे या अडीच महिन्यात हे काम पूर्ण होणे शक्य नाही. यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेली डेडलाईन फेल जाणार असल्याची खात्री प्रवाशी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.