• Sat. Apr 19th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुबलक पाण्यामुळे माणगाव बनणार विकासाचं ‘केंद्र’!

ByEditor

Apr 18, 2025

५० कोटीच्या सुधारित नळपाणी पुरवठा योजनेमुळे २५ वर्षाचे टेन्शन मिटले

सलीम शेख
माणगाव :
झपाट्याने विकसित होणारे तालुक्याचे मुख्यालय असलेले माणगाव शहरात सुमारे ५० कोटी खर्चाची सुधारित नळपाणी पुरवठा योजनेचे काम सुरू झाले आहे. मुबलक व पुरेशा पाण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या माणगावकरांची या योजनेमुळे पाण्याची प्रतीक्षा संपणार आहे. या योजनेमुळे माणगावकरांना शुद्ध व मुबलक पाणी नजीकच्या काळात मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षाची जुनी पाणीपुरवठा योजनेमुळे माणगावकरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. त्यामुळे विकासकांनी माणगावकडे पाठ फिरवली होती. या नवीन पाणी पुरवठा योजनेमुळे माणगावकरांना पुढील २५ वर्ष शुद्धीकरण केलेले मुबलक पाणी मिळणार आहे. अशाप्रकारे माणगाव नगरपंचायतीने नियोजन केल्यामुळे माणगावकरांचं टेन्शन मिटणार आहे. त्यामुळे नजीकच्या काळात माणगाव विकासाच ‘केंद्र’ बनणार आहे.

सुमारे ५० हजार नागरिकांना दर माणसी, दर दिवशी १३५ लीटर पाणी देण्याची योजना माणगाव नगरपंचायतीने आखली आहे. २६ ऑगस्ट २०२४ पासून सदर योजनेचे काम सुरू झाल्याची माहिती माणगाव नगरपंचायतीचे पाणी पुरवठा अभियंता आकाश बुवा यांनी दिली. ना. भरत गोगावले यांच्या प्रयत्नामुळे ४० वर्षानंतर ही सुधारित पाणी पुरवठा योजना हायडेनसिटी कॉलेटी पाईप द्वारा करण्यात येणार आहे. सध्या रेल्वे पुलाकडच्या पूर्वेला असलेल्या भागात जुन्या नळ योजनेतून पाणी मिळणार आहे. व पश्चिमेकडील गावातील भागासाठी खांदाड जवळ नदीच्या संगमाच्या अलीकडे नवीन जॅकवेल बांधून ७ लाख लीटरची पाणी साठवण्याची टाकी व स्वतंत्र फिल्ट्रेशन टाकी बांधण्यात येणार आहे. हे काम सध्या ३० टक्के झाले आहे. नागरिकांना पुरेसे स्वच्छ व शुद्ध पाणी मिळण्यासाठी ही पाणी पुरवठा योजना दोन विभागात करण्यात आली आहे. पूर्वीच्या टाकीची दुरुस्ती करण्यात येऊन सुमारे २ लाख ७५ हजार लिटर, २ लाख २५ हजार लिटर व १ लाख लिटरच्या विविध ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्या बांधण्याचे काम सुरू झाले आहे.

भादावमध्ये १ लाख लिटर, जुन्या माणगाव मध्ये १ लाख ८० हजार लिटर, नानोरे पूर्व १ लाख लीटर व पश्चिमेस २ लाख ७५ हजार लिटर, दत्त नगर मध्ये २ लाख लिटर अशा विविध ठिकाणी टाक्या बांधण्यात येणार असल्याची माहिती इंजिनियर आकाश बुवा यांनी दिली बाजारपेठेत २४ तास व इतर रहिवासी ठिकाणी सकाळी ३ तास व संध्याकाळी ३ तास पाणी पुरवठा करण्याची योजना आहे. पुण्याच्या एस. के इंटर प्रायझेस मार्फत हे काम सुरू असून २६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे . यात केंद्र सरकार ५०%, राज्यसरकार ४५% व माणगाव नगरपंचायत ५% असा खर्चाचा भार उचलणार आहे.

माणगाव हे गोद व काळ नदीच्या काठावर वसले असून मुंबई गोवा व दिघी पुणे या महत्वाच्या महामार्गावर आहे. अनेक शासकीय कार्यालये, बँका, महत्वाची शैक्षणिक संस्था व शासकीय निम शासकीय कार्यालये व्यापार उद्योग औद्योगीकरण त्यामुळे माणगावला येणार सरकारी कर्मचारी किंवा इतर नागरिक माणगाव च्या प्रेमात पडतात व इथेच स्थायिक होतात. ४० वर्षा पूर्वीची भादाव जवळ काळ नदीच्या डोहावर एकमेव जॅकवेल असलेली नळ पाणी पुरवठा योजना वाढीव भादाव, उत्तेखोल, नाणोरे, जुने माणगाव आदी भागाला नियमित पाणी पुरवठा करण्यास अपुरी पडते. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष आहे. यासाठी भविष्यात माणगावला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवू नये म्हणून सुमारे ५० कोटी रुपये खर्चाचे सुधारित नळ पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या नळ पाणीपुरवठा योजनेचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व पारदर्शक ठेकेदाराकडून नगरपंचायतीने करून घ्यावे एवढीच लोकांच्या मापक अपेक्षा आहेत. यामुळे स्वच्छ व सुंदर, परिपूर्ण माणगाव हे माजी आमदार लोकनेते अशोकदादा साबळे यांचे स्वप्न साकार होईल. व भविष्यात जिल्ह्याचे ठिकाण होण्यास एक पाऊल पुढे पडेल.
-डॉ. मोहन दोशी,
सामाजिक कार्यकर्ते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!