भेंडखळजवळ भीषण अपघातात एकाचा मृत्यू
घनश्याम कडू
उरण : तालुक्यात ट्रेलर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. शुक्रवार, दिनांक १७ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता भेंडखळ गावातील स्मशानभूमीजवळ भीषण अपघात झाला. श्री कृपा ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रेलर (एमएच ४६ बीएम १८२६) ने जोरदार धडक दिल्याने नविन शेवा गावातील मोटरसायकलस्वार नारायण एस. भोईर (वय ६५) यांचा जागीच मृत्यू झाला.
उरणमध्ये वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने आणि विविध शासकीय विभागांच्या उदासीनतेमुळे अशा घटना वाढत चालल्या आहेत.
अनाधिकृत कंटेनर यार्ड आणि बेशिस्त अवजड वाहने ठरत आहेत मृत्यूला कारणीभूत!
उरण परिसरात अनेक ठिकाणी नियमबाह्य कंटेनर यार्ड उभारले गेले आहेत. या यार्डमधून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक सार्वजनिक रस्त्यावरून सुरू असून, परिणामी अपघातांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आरटीओ, वाहतूक पोलीस, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सिडको यांची दुर्लक्ष वृत्ती आणि भ्रष्ट यंत्रणांमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असा आरोप नागरिक करत आहेत.
रस्त्यावर वजन काट्यांचे अपूर्ण व्यवस्थापन, वर्दळीतील बेशिस्त ट्रेलर्स, आणि रस्त्यालगत उभारलेली अनधिकृत भंगार दुकाने यामुळे निष्पाप तरुणांना जीव गमवावा लागत आहे. अपघातानंतर उरण पोलीस आणि वाहतूक शाखेने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला असला, तरी कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास ही मृत्यूयात्रा थांबणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
“आता तरी प्रशासन जागे होणार का?”
संतप्त नागरिक आणि प्रवाशांनी रस्त्यालगतच्या अनधिकृत बांधकामांवर आणि कंटेनर यार्डवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. निष्पाप लोकांच्या बळीला जबाबदार असलेल्या यंत्रणांवर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.