घनश्याम कडू
उरण : उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष आणि सामाजिक चळवळीत सतत आघाडीवर असणारे गोपाळ पाटील यांना “जीवन गौरव पुरस्कार” देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत मधुवन कट्टा कोकण साहित्य संमेलनातर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला. या पुरस्कारामुळे पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गोपाळ पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि जनहिताच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत आहेत. मग तो खोपटे पुलाची पाऊलवाट असो, करळ रेल्वे स्थानकावरील उड्डाणपूलाची मागणी, कामगारांच्या हक्कांसाठी आंदोलने असो किंवा कोणतेही सामाजिक विषय असो ते नेहमीच पुढे सरसावले. त्यांचा झपाटलेला स्वभाव, प्रश्नांवर ठाम भूमिका आणि लोकहितासाठीचा संघर्ष हा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. यावेळी कामगार नेते महादेव घरत व इतरांनाही जीवन गौरव पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
उरणच्या विमला तलाव परिसरात पार पडलेल्या सोहळ्यात मधुवन कट्टा कोकण साहित्य संमेलनाचे एल. बी. पाटील, कामगार नेते महादेव घरत, संजीवन पाटील, यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान देण्यात आला. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती होती, आणि वातावरण भारावलेले होते.
जीवन गौरव पुरस्कार म्हणजे फक्त एक प्रमाणपत्र नव्हे, तर समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तीच्या कार्याची पावती असते. गोपाळ पाटील यांचे कार्य आजच्या तरुण पिढीसाठी आदर्श ठरावे, असे मत अनेकांनी व्यक्त केले.