सलीम शेख
माणगाव : महाराष्ट्र सरकारद्वारे देण्यात येणार सन २०२३ – २४ या वर्षाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हा माणगाव तालुक्यातील न्हावे गावचे ॲड. पुंडलिक मालोरे यांचा सुपुत्र कु. ऋषिकेश पुंडलिक मालोरे यांना दि. १८ एप्रिल २०२५ रोजी पुणे या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, अजित पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. ऋषिकेश मालोरेला वुशू खेळातील उत्कृष्ट कामगिरीमुळे सदरच्या पुरस्काराने राज्य शासनातर्फे गौरविण्यात आले. या पुरस्काराने ऋषिकेशने माणगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या आनंदी क्षणाच्या निमित्ताने माणगाव येथे दि. १८ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वा. खांदाड नाका माणगाव या ठिकाणापासून ते माणगाव बसस्थानक तसेच बामणोली रोड येथील ऋषिकेश मालोरे यांच्या सद्गुरू पार्क सोसायटीतील निवासस्थानापर्यंत वाजतगाजत, नाचत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत माणगावकरांनी उत्साहात सहभागी होऊन ऋषिकेशचे खास अभिनंदन करून त्यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
