• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाड तालुका तब्बल 24 तास अंधारात!

ByEditor

Apr 19, 2025

निवडणुकीत मतांचा जोगवा मागणारे नेते गायब, जनतेने दाद मागायची कोणाकडे?

सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास -शिरगाव सरपंच सोमनाथ ओझर्डे

मिलिंद माने
महाड :
तब्बल २४ तास उलटून गेले तरी महाड तालुक्यात अंधाराचे साम्राज्य पसरले असून महाड औद्योगिक वसाहत परिसरात विद्युत पुरवठा करणाऱ्या केबल रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारामुळे तुटल्याने पूर्ण तालुक्यासह महाड शहरात वीज पुरवठा २४ तासापासून खंडित झाला आहे. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असताना मतांचा जोगवा मागणारे नेते मात्र गायब झाले असून तालुक्यातील जनता त्रस्त झाली आहे. या जनतेने न्याय कोणाकडे मागायचा? असा सवाल शिरगाव ग्रामपंचायत विद्यमान सरपंच सोमनाथ दिगंबर ओझर्डे यांनी राजकीय पुढार्‍यांना व प्रशासनाला केला आहे.

महाड औद्योगिक वसाहतीमधील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे १७ एप्रिल २०२५ पासून संपूर्ण महाड तालुक्यात वीजपुरवठा खंडित झाला असून त्यामुळे महाड शहरासहित तालुक्यातील सर्व गाव, वाड्यांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, गावात सुरू असलेल्या लग्नसराई, यात्रा, जत्रा, तसेच पाणीपुरवठ्यावरही मोठा परिणाम झाला आहे.

या संदर्भात शिरगावचे विद्यमान सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी विद्युत महामंडळाचे कार्यकारी अभियंता (MSEB EE) रामकृष्ण पाटील यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून याबाबत तालुक्यातील जनतेची नाराजी व्यक्त केली व तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. यावेळी चौकशीअंती असे सांगण्यात आले की, (महाड औद्योगिक वसाहती मधील) MIDC कडून रस्ते व गटारासाठी JCB ने सुरू असलेल्या खोदकामामुळे MSEB ने टाकलेली २२ केव्ही भूमिगत विद्युत लाईन तुटली आहे.

महाड औद्योगिक वसाहतीमधील भूमिगत विद्युत वाहिनी तुटली. हे पूर्णपणे MIDCच्या अयोग्य व नियोजनशून्य कामामुळेच हे झाले आहे. यामुळे संपूर्ण महाड तालुका दोन दिवसांपासून अंधारात आहे.

शिरगाव ग्रामपंचायत जागा देण्यास तयार -सरपंच सोमनाथ ओझर्डे

संपूर्ण महाड तालुक्याला योग्य वीजपुरवठा होण्यासाठी स्वतंत्र EHP (Extra High Power) स्टेशन आवश्यक आहे. शिरगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून EHP साठी लागणारी जागा शिरगावमध्ये उपलब्ध करून देण्याची तयारी सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी दर्शवली आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे कार्यकारी अभियंता पाटील यांना हा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्वरीत पाठवण्याची विनंती करण्यात आली आहे. याबाबत शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी शुक्रवारी रात्रीसुद्धा विद्युत महामंडळाच्या कार्यालयाला भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली व काम चालू असलेल्या ठिकाणी स्वतः भेट देऊन पाहणी केली. यावेळी महाड महावितरणचे अधिकारी भोई भेटले असता त्यांनी खोदकामामुळे वायर डॅमेज झाल्याचे मान्य केले.

शहर व ग्रामीण भाग यामध्ये भेदभाव न करता सर्वांना समान वीजपुरवठा मिळावा, हीच जनतेची मागणी आहे. यासाठी शिरगाव ग्रामपंचायत आवश्यक असणारी जागा उपलब्ध करून देण्यास तयार असल्याचे शिरगाव ग्रामपंचायत विद्यमान सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी सांगितले.

एकंदरीत चार महिन्यापूर्वी मतांचा जोगवा मागणारे राजकीय पक्षाचे पुढारी मात्र महाड तालुका २४ तास अंधारात असताना देखील याबाबत चकार शब्द न बोलता गेले कुठे? असा सवाल सोमनाथ ओझर्डे यांनी या राजकीय पक्षाच्या पुढार्‍यांना विचारला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!