मुंबई : महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी उद्धव ठाकरे यांच्याशी काम करण्याची माझी तयारी आहे, असे म्हणत शिवसेनेसोबत युती करण्याचा प्रस्ताव राज ठाकरे यांनी मांडला. त्यांच्या प्रस्तावाला उद्धव ठाकरे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आमच्यातली किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे. फक्त माझ्यासोबत येऊन महाराष्ट्राचं हित पाहायचं की भाजपसोबत जाऊन हित पाहायचं, याची स्पष्टोक्ती झाली पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
अभिनेते महेश मांजरेकर यांना राज ठाकरे यांनी विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत महाराष्ट्र, मराठी माणूस, मुंबई महापालिका निवडणूक, एकनाथ शिंदे यांचे राजकारण, उद्धव ठाकरेंशी युती, भाजपशी जुळत असलेले सूर आदी विषयांवर राज ठाकरे यांनी मनमोकळी उत्तरे दिली. मुंबई महापालिकेच्या तोंडावर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना टाळी देण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्या टायमिंगची चर्चा होत आहे. उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरे यांच्या प्रस्तावावर लगोलग भूमिका स्पष्ट केली. दादरच्या शिवाजी महाराज स्मृती मंदिरमधून कामगार सेनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
