मुरुड येथील हॉटेल सी शेल येथील जलतरण तलावात बुडून पाच वर्षीय मुलीचा मृत्यू
अमुलकुमार जैन
अलिबाग : सागरी पर्यटनसाठी जगप्रसिद्ध असलेल्या मुरुड तालुक्यातील मौजे मुरुड समुद्रनजिक असलेल्या सी शेल या हॉटेलच्या खाली असणाऱ्या जलतरण तलावात पाच वर्षीय माही चक्रधर ताकभाते हिचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून याबाबत मुरुड पोलिस ठाण्यात मयत हिचे वडील चक्रधर कृष्णा ताकभाते (वय ३४ वर्ष, रा. थेरगाव पुणे, मुळ रा. श्रीपत पिंपरी, ता. बार्शी, जि. सोलापुर) यांनी माहिती दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालय अंतर्गत असणाऱ्या सांगवी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असणारे चक्रधर कृष्णा ताकभाते हे त्यांचे तुळजापूर येथे गटविकास अधिकारी असलेले चुलत भाऊ अमोल ताकभाते या दोघांचे कुटुंबीय हे रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा येथे सागरी पर्यटनासाठी आले होते. त्यांनी मुरुड शहरात प्रवेश करतानाच सुरवातीला असलेल्या हॉटेल सी शेलमध्ये दि. १८ एप्रिल २०२५ रोजी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी हॉटेलच्या अभ्यागत कक्ष येथून तिसऱ्या मजल्यावर असलेल्या रूमच्या किल्ल्या घेऊन वरती गेले. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक चक्रधर ताकभाते आणि गटविकास अधिकारी अमोल ताकभाते या दोघांच्या पत्नी ह्या एका रूममध्ये जाऊन गप्पागोष्टी करू लागल्या म्हणून उपनिरीक्षक चक्रधर ताकभाते आणि गटविकास अधिकारी अमोल ताकभाते हे दोघेही दुसऱ्या रूममध्ये गेले होते. त्याच वेळी चक्रधर ताकभाते यांची कन्या माही आणि अमोल ताकभाते यांची मुलगी आन्वी (वय ५) अश्या दोघीही कोणालाही काही न विचारता दुपारी दोनच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरून खाली खेळण्यासाठी गेल्या. माही हिने जलतरण तलाव पाहून तलावच्या बाजुला चप्पल काढुन ती जलतरण तलावमध्ये उतरली. ती बुडत असल्याचे पाहून आन्वी हॉटेल सी शेलच्या तिसऱ्या मजल्यावर परत गेली अन् तिने माही खाली असलेल्या तलावात बुडत असल्याचे सांगितले. हे ऐकून पोलिस उपनिरीक्षक चक्रधर ताकभाते आणि गटविकास अधिकारी अमोल ताकभाते खाली धावत आले.
माही हिचे वडील चक्रधर ताकभाते आणि काका अमोल ताकभाते यांनी पाण्याबाहेर काढुन ग्रामीण रुग्णालय मुरूड येथे दाखल करुन तेथील डॉक्टरांनी माहीला कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन (सीपीआर) व इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ईसीजी) ही वैद्यकीय चाचणी केली असता तीच्याकडून काही एक प्रतिसाद न मिळाल्याने डॉक्टरांनी माही हिला दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी मयत घोषीत केले. माही हिचे शवविच्छेदन करून तिचा मृतदेह हा सायंकाळी साडे सहाच्या सुमारास वडील चक्रधर ताकभाते यांच्या स्वाधीन करण्यात आला.
