माजी आमदार पुत्र आणि नातवावर गुन्हा दाखल
अमुलकुमार जैन
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील किहीम सरपंच प्रसाद गायकवाड उर्फ पिंट्या यांना बामणसुरे येथे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे पुत्र राजेंद्र ठाकूर उर्फ राजा ठाकूर, सम्राट राजेंद्र ठाकुर (दोघे रा. सातीर्जे, ता. अलिबाग) या दोघांनी शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रिती प्रसाद गायकवाड (वय 34 वर्षे, बामणसुरे, पोलिस पाटील, रा. मु. पो. चोंढी, ता. अलिबाग, जि. रायगड) यांनी मांडवा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
प्रीती गायकवाड यांनी मांडवा सागरी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, प्रीती गायकवाड यांचे पती हे किहीम ग्रामपंचायत सरपंच असून किहीम ग्रामपंचायत हद्दीतील बामणसुरे आदिवासी वाडी येथे जाणारा रस्ता खराब झाल्याने माझे पति यांचे प्रयत्नानुन चोंढी पुल ते बामणसुरे अदिवासी वाडी व चोंढी पुल ते सातीर्जे पुल असे रस्ते शासनाकडुन मंजुर झालेले आहेत व त्या दोनही रस्त्याचे काम दि. 4.4.2025 रोजीपासुन सुरू करण्यात आलेले आहे. दि. 16/04/2025 रोजी सातीर्जे पुल रस्त्याचे काम मिळालेले रामेश्वर कस्ट्रक्शन कं. प्रा. लि. चे प्रोप्रायटर राजु पिचिका यांचे सुपरवायजर केतन यांनी फोन करून सरपंच प्रसाद गायकवाड यांस कळविले की, “सदर दोन्ही रस्त्यावर डांबराचा थर (कारपेट) टाकण्याचे काम आता करणार आहोत, तर सरपंच म्हणुन नारळ फोडायला येथे या, वाट पाहत आहोत.” असे बोलल्याने लगेच सरपंच प्रसाद गायकवाड, हर्षला संदेश पाटील (रा. कोळगांव), प्रदिप पाटील (रा. पोयनाड), रोशन नाईक ( रा. किहीम अदिवासीवाडी) फिर्यादी व बामणसुरे ग्रामस्थ असे सर्वजण बामणसुरे येथे नारळ फोडण्याचे कार्यक्रमास गेलो. नारळ फोडण्याचा कार्यक्रम समेळवाडी येथे राहणारे नवनित करमेळे यांचे घराचे समोरच सदर रस्त्यावर होता. तेथे गेल्यावर पाहिले की तेथे आधिच माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे पुत्र राजेंद्र मधुकर ठाकुर व त्यांचा मुलगा सम्राट राजेंद्र ठाकुर (दोघे रा. सातीर्जे, ता. अलिबाग) तसेच राजु पिचिका यांचे सुपरवायजर केतन व त्याचे कामगार असे तेथे उपस्थित होते. त्यावेळी पाहिले की, राजेंद्र ठाकुर यांनी सरपंच प्रसाद गायकवाड आणि इतर मंडळी येण्यापुर्वीच तेथे रस्त्याचे कामाचे शुभारंभाचा नारळ फोडला होता. त्यावेळी तेथे रस्त्याचे कामासाठी वापरली जाणारी वाहने चालु होती.
तेथे गेल्यावर सरपंच या नात्याने सदरचा नारळ फोडण्याचा मान काम मिळालेल्या कंपनीचे प्रोप्रायटर यांनी प्रसाद गायकवाड यांना दिला असल्याने सरपंच प्रसाद गायकवाड यांनी 4.15 वा.चे सुमारास नारळ फोडण्याकरीता सदरची वाहने थांबवली व नारळ फोडण्यासाठी हातात घेतला. त्यावेळी तेथे राजेंद्र मधुकर ठाकुर व त्यांचा मुलगा सम्राट राजेंद्र ठाकुर तेथे आले व प्रसाद गायकवाड यांना रागाने बोलू लागले की, “नारळ फोडण्याचा संबंध काय? तु इथे का आलास?”. तरीसुध्दा प्रसाद गायकवाड हे राजेंद्र ठाकुर यांना काहीएक न बोलता ते त्यांचा नारळ फोडायला गेले. त्यावेळी सम्राट हा सरपंच प्रसाद गायकवाड यांना अश्लिल भाषेत अशी शिवी देवुन बोलला की, “तु इथे का श्रेय घ्यायला आलास, काम आम्ही आणलेली आहेत.” त्यावेळी फिर्यादी यांनी सम्राट याला तु शिवी देवु नको असे बोलेले. तेव्हा लगेच राजेंद्र ठाकुर हा फिर्यादी बरोबर वाद करायला लागला व अश्लिल भाषेत बोलुन आम्हाला आई बहिणीवरून शिवीगाळी करू लागला. त्यावेळी राजेंद्र ठाकुर यांचे कंबरेला पिस्तूल लावलेले होते व त्याकडे इशारा करून राजेंद्र ठाकुर हा सरपंच प्रसाद गायकवाड यांना बोलु लागला की, “तुला एकदा मारले आहे, तुझी हौस काय फिटत नाही, आज तुझी कायमचीच खाज मिटवतो.” असा रागाने मोठमोठ्याने ओरडुन धमकी देवुन बोलु लागला व रस्त्याचे कामाकरीता वापरली जाणरी पेवर मशिनचे चालक याला मोठमोठ्याने ओरडुन “तु मशिन थांबवु नकोस” असे बोलू लागला.
त्यानंतर फिर्यादी यांनी कोणत्याही प्रकारचा वाद नको याकरीता सरपंच व इतर सर्वांना घेवुन घरी जाण्याकरीता निघाले. तेव्हा राजेंद्र ठाकुर व त्याचा मुलगा हे घरी जाण्याच्या रस्त्याचे मध्ये उभे राहुन दोघे रागाने फिर्यादी व सरपंच यांना म्हणाले की, सर्वांचीच खाज मिटवून टाकतो, येथुन आता लगेच निघुन गेला नाहीस तर तुला ठार मारून टाकतो. अशी धमकी देवु लागला. यापुर्वी दि. 19.11.2024 रोजी देखील राजेंद्र ठाकुर व त्याचा मुलगा सम्राट ठाकुर यांनी सरपंच प्रसाद गायकवाड यांचे सोबत त्यांनी आमदार अदिती तटकरे यांचे विजयाचा बॅनर लावला याचा राग धरून वाद घातला होता व त्या वादाचा व्हिडीओ सम्राट यांनी बनवला होता व तो व्हिडीओ आज देखील सगळ्यांना दाखवुन राजेंद्र ठाकुर फिर्यादी यांची बदनामी करत आहेत. राजेंद्र ठाकुर यांचे वडील कै. मधुकर शंकर ठाकुर यांचेशी जिव्हाळ्यांचे संबंध असल्याने फिर्यादी यांनी त्या वादाबाबत कोठेही तक्रार केलेली नव्हती. असे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सरपंच यांना शिवीगाळ करीत जीवेठार मारण्याची धमकी म्हणजे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या या समस्येचे टोकाचे स्वरूप अधोरेखित करते.
