दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अमुलकुमार जैन
रायगड : महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये महिलांवर अत्याचार व विनयभंग होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी महाड तालुक्यातील देशमुख कांबळे शिंदे कोंड येथे एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. निळकंठ बाळा सावंत (वय 54), विशाल निळकंठ सावंत (वय 35) दोघेही संतोष नगर, नांगलवाडी येथील रहिवाशी असून या दोघा आरोपींविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांचे पहिले पती मयत झाले असून त्यांनी साहिल दीपक शिंदे यांच्याशी दुसरा विवाह केला आहे. मयत पती व तक्रारदार या दोघांनी मिळून मारुती सुझुकी कंपनीची वॅगनार कार खरेदी केली असून ती तक्रारदार यांचे ताब्यात आहे. वरील दोघा आरोपींनी तक्रारदार यांच्या घरी जाऊन संबंधित कार मागण्याचा प्रयत्न केला. परंतु तक्रारदार यांनी कार देण्यास नकार दिला. या प्रकरणामुळे दोघेही आरोपी तक्रारदार यांचे पती यांच्या अंगावर धावून गेले असता तक्रारदार सदर ठिकाणी पोहोचल्या. यानंतर दोघा आरोपींनी तक्रारदार यांच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून त्यांचा विनयभंग केला. या संपूर्ण घटनेमुळे दोघा आरोपी विरोधात विनयभंग व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व महाड एमआयडीसी पोलीस ठाणे अतिरिक्त कार्यभार पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश गोरेगावकर या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
