मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता केव्हा येणार याकडे सर्व पात्र महिलांचे लक्ष लागलेले आहे. या योजनेचे पैसे खात्यात जमा झालेत की नाही हे तपासण्याकरता अनेक महिला बँकेत रांगाही लावत आहेत. मात्र, एप्रिल महिन्याचे पैसे अद्यापही सरकारकडून देण्यात आलेले नसून यासंदर्भात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली. त्या आज माध्यमांशी बोलत होत्या.
जुलै महिन्यापासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत अडीच लाखांच्या उत्पन्न असलेल्या महाराष्ट्रातील महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. या योजनेकरता इतर अनेक निकषही शासननिर्णयानुसार लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार, सध्याच्या घडीला राज्यात २ कोटी ४७ लाख महिला या योजनेसाठी पात्र आहेत. जुलैपासून सहा हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. एप्रिलचा सातवा हप्ता असून हा महिना संपत आला तरीही या योजनेअंतर्गत लाभ महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे यासंदर्भात सातत्याने सरकारला प्रश्न विचारला जात आहे.
आज माध्यमांशी संवाद साधताना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, “एप्रिल महिना संपण्याच्या आधी पात्र महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ वितरीत केला जाणार आहे.” दरम्यान, आदिती तटकरे यांनी यासंदर्भात कोणतीही थेट तारीख दिली नसून आता महिना संपण्यास अवघे ९ दिवस उरलेले असताना सरकारकडून पात्र महिलांना हे पैसे कधी मिळणार याबाबत चर्चेला जोर आला आहे. काही वृत्तांनुसार, अक्षय तृतीयेला हा निधी वितरीत केला जाणार आहे. ३० एप्रिलला अक्षय तृतीया आहे. त्यामुळे आता पात्र महिलांना ३० एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या योजनेतील पात्र महिलांच्या अर्जांच्या छाननी प्रक्रियेविषयी विचारण्यात आलं. तेव्हा आदिती तटकरे म्हणाल्या, “सुरुवातीपासून या योजनेसंदर्भात फार गैरसमज पसरवले गेले आहेत. अडीच लाखांचे उत्पन्न असलेल्यांनाच हा लाभ मिळणार आहे. त्यात नवं काही नाही. लाडकी बहीण योजनेचा शासननिर्णयात हेच नमूद आहे.”
“ज्या महिला इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत, संजय गांधी निराधार योजनेतून घेत असतील, तर त्यांना त्या योजनेचे १५०० रुपये मिळत आहेत. त्यामुळे तसंही त्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाहीत. ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना १००० रुपये मिळत नमो शेतकरी योजनेतील मिळतील आणि तर ५०० रुपये लाडकी बहीण योजनेमधून मिळतील. हेच मूळ शासननिर्णयातही म्हटलं आहे”, असंही आदिती तटकरे म्हणाल्या.
