शशिकांत मोरे
धाटाव : कामगार क्षेत्रात १९९३ साली काम करीत असताना कामगारांचे नेतृत्व करण्याची संधी माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला मिळाली. त्यानंतर भारतीय कामगार सेनेने विभागवार काम करण्याची संधी दिली आणि चिटणीस पदावर काम करू लागलो. मुख्यतः चळवळीत काम करण्याची आवड असल्याने काम करीत राहिलो आणि त्याच कामाची पोचपावती नुकत्याच झालेल्या संघटनेच्या कार्यकारिणी निवडीत संयुक्त सरचिटणीस पदाची जबाबदारी अध्यक्ष अरविंद सावंत साहेबांकडून मिळाली. मला मिळालेल्या पदाचा मी तुम्हा कामगार वर्गासाठी निश्चतच अधिकाधिक काम करीत असताना तुमचा विश्वास सार्थकी ठरविन. त्याचप्रमाणे भारतीय कामगार सेनेचे कोकणात संघटनात्मक काम करीत असताना आज रोह्यातील तुम्हा सर्व कामगारांनी दिलेले प्रेम माझ्या मनात अग्रस्थानी राहील असा विश्वास भारतीय कामगार सेनेचे नवनिर्वाचित संयुक्त सरचिटणीस उदय शेटे यांनी व्यक्त केला.
रोह्यात रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीच्या महिला कार्यशाळा सभागृहात संयुक्त सरचिटणीसपदी निवडीबाबत आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी युनिट सरचिटणीस सुनील मुटके, महेश वाचकवडे, दिनेश मोरे, नितीन वारंगे, सचिन भगत, अशोक कडव यांसह कामगार वर्ग उपस्थित होते. उपस्थित कामगारांना संबोधित करताना ते पुढे म्हणाले, सध्या स्पर्धेचे युग असल्यामुळे महामारीचे संकट आहे. ज्यांनी ही औद्योगिक वसाहत आणली त्या व्यक्ती हयात नसल्या तरी त्यांचे स्मरण होणे गरजचे आहे. कंपनी जगली तर कामगार जगेल हाच उद्देश मनात ठेवून नाण्याच्या दोन्ही बाजू सांभाळत आपल्याला काम करायचे आहे असा सल्ला त्यांनी शेवटी दिला.
याठिकाणी उदय शेटे यांचा युनिकेम लॅबोरेटरीज, अंशुल स्पेशलिटी, निलिकॉन फूड डाइज, रोहा डायकेम, ट्रान्सवर्ड फर्टीकेम यांसह इतर कंपनीतील युनिट अध्यक्ष आणि कामगार प्रतिनिधीसह कामगार वर्गाकडून सन्मान करण्यात आला. याठिकाणी सचिन भगत, संदेश बामणे, प्रमोद शिंदे, रेप्टाकॉस, ट्रान्सवर्ड कंपनीच्या कामगार प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.