• Thu. Jul 31st, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याला जिल्हा प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य

ByEditor

Apr 24, 2025

टँकरची मागणी आल्यानंतर 24 तासात पाणी पुरवठा करण्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे निर्देश

रायगड : पिण्यासाठी पाणी हे आपले सर्वोच्च प्राधान्य आहॆ. त्यामुळे जिल्ह्यात ज्या ठिकाणी टँकरची मागणी होईल त्या ठिकाणी आवश्यक तपासणी करून 24 तासाच्या आत टँकरने पाणी पुरवठा सुरू करावा. टंचाईग्रस्त गावात नागरिकांना पिण्याचे पाणी कमी पडणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणानी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी टंचाईविषयक आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सर्व तालुक्यातील पाणी टंचाईच्या सद्यस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. या बैठकीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपजिल्हाधिकारी डॉ.रविंद्र शेळके यांसह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी दूरदृश्‍यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यातील पाणी टंचाईची परिस्थिती विचारात घेवून जिल्ह्यात कोणत्याही गाव, वाडी-वस्तीवर पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्यास त्यादृष्टीने तातडीने उपाययोजना करून नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात यावा असे जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले. प्रशासनाचे पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेला सर्वोच्च प्राधान्य आहॆ. यामध्ये कुठल्याही प्रकारची दिरंगाई चालणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जिथे पाणी पुरवठा योजना प्रलंबित आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करा. पाणी टंचाईसंदर्भात माध्यमांमध्ये बातम्या येतात त्याकडे गांभीर्याने पाहावे, वस्तुस्थिती तपासावी. याबाबत तात्काळ त्या विभागाचे स्पष्टीकरण द्यावे अशा सूचनाही श्री. जावळे यांनी यावेळी दिल्या.

पाणी साठ्यातील पाण्याचे प्रमाण कमी झाले की, स्त्रोत दुषित होऊ शकतात. यामुळे साथीचे आजार उद्भवू शकतात हे लक्षात घेऊन पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही ते तपासावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. जलजीवन मिशनची कामे तातडीने पूर्ण करा. तसेच जी कामे पूर्ण झाली आहेत त्या योजनातून तात्काळ पाणी पुरवठा सुरु करा. तसेच ज्या पाणी पुरवठा योजनेची थकीत वीज देयके असतील तर त्या ठिकाण चे वीज देयक खंडित होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यात यावे असेही श्री.जावळे यांनी यावेळी सांगितले.

शहरी भागासोबतच गाव, वाड्या-वस्त्यांवर पाणी पुरवठा करण्यासाठी विहिरी, विंधन विहारींचे अधिग्रहण, नळ योजनांची दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळ योजना, नवीन विंधन विहिरी, टँकरद्वारे पाणी पुरवठा आदी विविध बाबींचा समावेश असलेला पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच आज अखेर जिल्ह्यात 106 वाड्या आणि 21 गावांना 25 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहॆ. तसेच 17 विहिरी खोल करणे व गाळ काढण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे,असेही श्री. जावळे यांनी यावेळी सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!