बॉक्साइड वाहतूक करणारा डंपर रस्त्यावर कलंडला; जीवितहानी टळली
वैभव कळस
म्हसळा : शहराचे पर्यायी मार्गावरील दिघी-पुणे राष्ट्रीय मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. श्रीवर्धन तालुक्यात मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात येत असलेल्या बॉक्साइड (मायनिंग मिश्रीत माती) वाहतूक श्रीवर्धन माणगाव मार्गे राष्ट्रीय मार्गावरून अवजड वाहनाने करण्यात येत आहे.
वाहतुकीस वापरातील गाड्या त्यांचे वाहन चालक व मालक पैशाच्या हव्यासापोटी अवजड वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत नसल्याने म्हसळा हद्दीतील राष्ट्रीय मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. मार्च व एप्रिल महिन्यात अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांचे पाठोपाठ पाच अपघात घडले आहेत.
आज दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी दुपारचे दरम्यान श्रीवर्धनकडून बॉक्साइडने खचाखच भरलेला अक्षय ट्रान्सपोर्टचा डंपर (क्र. एमएच ४६ बीएफ १६८८) सकलपचे उतारावर असताना ज्या घटनास्थळी अपघातांची मालिका सुरूच आहे त्याच ठिकाणी आज डंपर घसरत रस्त्याचे मधोमध कलंडला आहे. घटनास्थळी अपघाती गाडीची अवस्था पहाता ती अवजड वाहतूक करण्यास अपात्र असल्याने गाडीचा चक्काचुर झाला आहे.
अपघातात चालकाचे पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची गंभीरता लक्षात घेता सुदैवाने जीवितहानी टळली आहे, तर गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताचे वृत्त समजताच म्हसळा तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रोहिनकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी व मदत कार्य केले.