खारफुटी तोड, डेब्रिज टाकून बेकायदा बांधकामांची तयारी
घनःश्याम कडू
उरण : उरणमधील समुद्र किनारपट्टीला लागून असलेल्या खाडी भागात भूमाफियांनी बेकायदा बांधकामाचे धाडस सुरू केले आहे. गेल्या काही दिवसांपासून खाडीतील खारफुटीची तोड करून, त्याठिकाणी सिमेंट, विटा, तुटलेल्या लाद्या आणि बांधकामाचा टाकाऊ मलबा (डेब्रिज) टाकून खाडी बुजवली जात आहे.भरदिवसा मलबा टाकण्यात येतो आणि रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साहाय्याने तो सपाट केला जातो. नंतर या जागांवर चाळी, पार्किंग व ढाबे उभारण्याचे काम सुरू आहे.
उरण परिसरातील जमिनींच्या वाढत्या किमतींमुळे भूमाफियांनी आपली नजर खाडी किनार्यावरील जमिनींवर वळवली आहे.ही संपूर्ण कारवाई नगरपालिका, ग्रामपंचायत, मेरिटाईम बोर्ड, महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या अनभिज्ञतेत सुरू असून, नैसर्गिक परिसंस्थेला धोका पोहोचवणारी आहे. यामध्ये अनेक ठिकाणी खारफुटी तोडली जात आहे, जी पर्यावरणासाठी अत्यंत आवश्यक आहे.या बेकायदा चाळींमधील रहिवासी आपला कचरा थेट खाडीत टाकतात, त्यामुळे जलप्रदूषणही वाढले आहे.
स्थानिक पातळीवर भूमाफियांची दहशत असल्याने अनेकजण उघडपणे विरोध करत नाहीत. मात्र, सकाळ-संध्याकाळ फिरायला येणार्या नागरिकांनी याला तीव्र विरोध दर्शवला आहे आणि संबंधित यंत्रणांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.