अलिबाग : मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून साहित्यसंपदातर्फे राज्यस्तरीय साहित्यसंमेलन अलिबाग येथे आयोजित करण्यात आले आहे. दिनांक १ मे रोजी आदर्श नागरी पतसंस्था येथे सकाळी १० ते ६ या वेळेत संमेलन पार पडेल अशी माहिती साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे यांनी दिली. संमेलन अध्यक्षस्थानी जेष्ठ गझलकार ए.के. शेख यांची निवड करण्यात आली आहे. सुरेश पाटील, संस्थापक आदर्श नागरी पतसंस्था यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. जेष्ठ पत्रकार नागेश कुलकर्णी आणि रायगड भूषण रमेश धनावडे प्रमुख निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी अलिबागमधील जेष्ठ कवी अनंत देवघरकर, कवयित्री वैशाली भिडे आणि इतर साहित्यिकांची उपस्थिती राहणार आहे.
संमेलनाची विशेष बाब म्हणजे जेष्ठ गझलकार ए.के. शेख, लेखक सुनील चिटणीस, रायगड भूषण, लेखक, कवी रमेश धनावडे, कवी दिलीप मोकल आणि कवी वैभव धनावडे या सर्व रायगडकर लेखकांच्या, कवींच्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे. मराठी भाषा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या निवडक संस्थांचा आणि व्यक्तींचा सन्मान साहित्यसंपदा ‘मराठी दीपस्तंभ’ पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे. नव लेखकांना प्रोत्साहन म्हणून काही निवडक पुरस्कारांचा वितरण करण्यात येणार आहे.
स्वागताध्यक्ष म्हणून किसन पेडणेकर काम पाहणार असून कार्याध्यक्ष लालसिंग वैराट आणि मीडिया पार्टनर म्हणून मनोमय मीडिया जवाबदारी सांभाळणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीविता पाटील, सलोनी बोरकर आणि अर्चना गोरे करणार आहेत. सदर कार्यक्रमात आपल्या कार्यातून बहुमूल्य योगदान देणाऱ्या सुरेश पाटील आणि डॉ. राजाराम हुलवान यांना ‘समाज रत्न’ पुरस्कार देऊन गौवरविण्यात येणार आहे. सदर संमेलनात गझल मुशायरा, काव्यवाचन, अभिवाचन पार पडणार असून सदर साहित्य संमेलनाचा सर्वानी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील पिढयांना मराठीची गोडी लावण्यासाठी जास्तीत जास्त लहान मुलांना आणि तरुणांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन साहित्यसंपदातर्फे करण्यात आले आहे.