घन:श्याम कडू
उरण : उरणमधील रस्त्यांवर मृत्यूचे थैमान सुरु असून आज सकाळी पुन्हा एकदा जासई दास्तान फाटा उड्डाणपुलावर अपघात झाला. या अपघातात अंकिता मयेकर या २९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ट्रेलरने जोरदार धडक दिल्याने अंकिताच्या डोक्याला जबर मार बसला आणि अंकिताचा जागीच मृत्यू झाला.
अंकिता नेहमीप्रमाणे नवी मुंबईत कामावर जात होती, मात्र आज थोडा उशीर झाला आणि रेल्वे निघून गेली. वेळेवर पोहोचण्यासाठी अंकिता मोटारसायकलने निघाली. मात्र हा प्रवास तिच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास ठरला. जेएनपीटी, ओएनजीसी, बीपीसीएल, एनएडी एवढे सगळे प्रकल्प उरणमध्ये असूनही जनतेसाठी एक सुसज्ज हॉस्पिटल उभं राहिलं नाही. या कंपन्यांचा सीएसआरचा पैसा नेमका जातो कुठे? असा प्रश्न येथील जनतेला पडला आहे. जासई दास्तान फाटा उड्डाणपुल सुरू झाल्यापासून हा साधारण चौथा बळी असेल. यावेळी एका तरुणीचा बळी गेला आहे. हा अपघात नसून हे प्रशासनाच्या बेफिकिरीचे थरकाप उडवणारे परिणाम आहेत.
आज उरणमध्ये अपघात झाल्यावर हॉस्पिटल कुठे? उपचार कुठे? वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली असती तर अंकिता वाचली असती का? हा प्रश्न आता संपूर्ण उरणकरांना अस्वस्थ करीत आहे. जनतेच्या रक्षणाची शपथ घेणारे नेते आज कोणत्या पक्षात जायचे व कोण जाणार या चर्चेत गुंतलेत? कुणाच्या पाठीत खंजीर घालायचा आणि कुणाच्या खांद्यावर चढायचं, हाच अजेंडा दिसतोय. हे थांबवायचं असेल, तर उरणकरांनीच एकत्र येऊन आवाज उठवायला हवा. नाहीतर उद्याचा बळी कोण? हे विचारण्याची वेळही मिळणार नाही.