संतोष पवार यांचे उपोषण स्थगित
घन:श्याम कडू
उरण : उरण नगरपरिषदेत काम करणाऱ्या ४३ स्त्री-पुरुष कंत्राटी सफाई कामगारांना कामावरून अचानक कमी करणाऱ्या भाग्यदीप वेस्ट मॅनेजमेंट कंपनीविरोधात म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या नेतृत्वाखाली उरण नगरपरिषदेपुढे सुरू असलेले ठिय्या आंदोलन अखेर यशस्वी ठरले आहे.
संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली १ मेपासून सुरू होणाऱ्या बेमुदत आमरण उपोषणाच्या तयारीने प्रशासन हादरले आणि अखेर गंभीर दखल घेतली. मुख्याधिकारी समीर जाधव यांच्या पुढाकाराने झालेल्या चर्चेत सर्व ४३ कामगारांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर नवीन ठेकेदार नेमून त्यांना किमान वेतन, EPF, ESIC लाभ देण्याचेही मान्य करण्यात आले आहे. याच बैठकीत लाड समितीनुसार वारस हक्काच्या नोकऱ्या १५ मे २०२५ पर्यंत दिल्या जातील असे आश्वासनही देण्यात आले. या ऐतिहासिक निर्णयाचे कामगारांनी जल्लोषात पेढे वाटून स्वागत केले. कामगारांचे म्हणणे आहे की, “आज आपली नोकरी वाचली ती केवळ युनियनच्या संघर्षामुळेच!”

यावेळी अध्यक्ष ॲड. सुरेश ठाकूर, कार्याध्यक्ष संतोष पवार, सरचिटणीस अनिल जाधव, कोषाध्यक्ष दत्तगुरू म्हात्रे, तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी उपस्थित कामगारांना संबोधित करताना सांगितले, “ही लढाई केवळ पोटाची नव्हे, तर गोरगरीब दलित-आदिवासी कामगारांच्या न्यायहक्कांची होती. ही लढाई होती स्वाभिमानाची!”, सहाय्यक कामगार आयुक्त कुलकर्णी मॅडम, उपजिल्हाधिकारीरविंद्र शेळके, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल नेहूल, पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ आणि ॲड. राजेंद्र मढवी यांच्या सहकार्यामुळे हे आंदोलन यशस्वी झाले.
युनियनचे कार्यालयप्रमुख महेंद्र गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात उरण युनिटचे कामगार प्रतिनिधी मधूकर भोईर, हरेश जाधव, माधव सिद्धेश्वर यांचे विशेष योगदान असल्याचे नमूद केले आहे.