विनायक पाटील
पेण : तालुक्यातील वाशी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच संदेश शंकर ठाकूर यांची राष्ट्रीय प्रधान मुखिया सरपंच संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंचायत राज व्यवस्थेच्या सशक्तीकरणासाठी, ग्रामविकासाठी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्कर्षासाठी त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन ही निवड करण्यात आली.
सरपंच संदेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली वाशी ग्रामपंचायतीने घनकचरा व्यवस्थापन, तलाव सुशोभीकरण, स्वच्छता अभियान तसेच माझी वसुंधरा 5.0 या उपक्रमांत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या योजनाबद्ध आणि विकासाभिमुख कामांमुळे वाशी विभागातील स्वच्छता, पर्यावरण व ग्राम विकासाला सकारात्मक चालना मिळाली आहे. या कार्याची दखल राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल उके, प्रदेशाध्यक्ष प्रमोद सांगोले व महासचिव नितिन ताथोड यांनी घेतली असून, त्यांच्या संमतीने संदेश ठाकूर यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने वाशी विभागासह पेण तालुक्यातून हितचिंतक अभिनंदन करत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत.