मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाबाबतची इच्छा जाहीररित्या व्यक्त केली होती. ज्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत केलेले विधान चांगलेच चर्चेत आले आहे.
सुनील तटकरे यांनी मुंबईत राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेबाबत आणि आगामी निवडणुकांबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. ‘अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक वेळा शपथ घेतलेली आहे. मात्र अजित पवार यांनी पुढची शपथ ही मुख्यमंत्री म्हणून घ्यावी हे स्वप्न आहे. तसेच हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचं असेल तर असे पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा तटकरे यांनी व्यक्त केली.
पुढे सुनील तटकरे म्हणाले की, ‘देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश पुढे जात आहे, हे लक्षात घेऊन आणि विचारांशी तडजोड न करता आम्ही सत्तेत सहभागी झालो. लोकसभा निवडणुकीनंतर सगळ्यांना वाटलं की, अजित पवार संपले. मात्र आम्हाला विश्वास होता. विधानसभा निवडणुकीत परिमाण वेगळा दिसला.”
“अजित पवार यांनी आतापर्यंत सर्वाधिक वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडलेला आहे. त्यांनी महाराष्ट्राचा समतोल विकास केला. देवेंद फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची काम करताना साथ मिळत आहे. पण आपण सगळे मिळून अधिक ताकद वाढवू आणि सरकार अधिक उत्तम चालेल यासाठी प्रयत्न करू, असा विश्वासही तटकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
अजित पवार काय म्हणाले होते?
मुंबईतील एका कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी राज्याला महिला मुख्यमंत्री मिळायला हवी, असे मत मांडले. त्यावर अजित पवार यांनी “आपल्याला सगळ्यांना तसं वाटत असतं पण शेवटी मात्र योग पण जुळून यावा लागतो. आता मलाही वाटत मी मुख्यमंत्री व्हावं कुठं जमतंय. कधी ना कधी तो योग येईल, नाही असं नाही,” असा विश्वासही व्यक्त केला.
