प्रतिनिधी
अलिबाग : सुप्रसिद्ध साहित्यिक रमेश धनावडे यांच्या ‘असेच काहीतरी’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ गझलकार व साहित्यिक ए.के. शेख, ज्येष्ठ साहित्यिक व कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्हा संपर्कप्रमुख एल. बी. पाटील, को.म.सा.प. अलिबाग शाखा अध्यक्षा व रायगड जिल्हा उपाध्यक्षा सुजाता पाटील, साहित्यिक रोहिदास पोटे, साहित्यिक सुभाष कटकदौंड, मुरुड को.म.सा.प. संपर्कप्रमुख संजय गुंजाळ, रायगड जिल्हा पत्रकार संघ उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, स्त्रीरोग तज्ञ व साहित्यिक डॉ. चंद्रकांत वाजे, पूनम धनावडे आणि ॲड. विलास नाईक व इतर मान्यवर यांच्या हस्ते झाले.
रमेश प्रभाकर धनावडे यांचे शिक्षण एम.कॉम., एल एल. बी., एम.बी.ए. असे झाले असून ते रिलायन्स इंडस्ट्रीज नागोठणे येथे डेप्युटी जनरल मॅनेजर एच. आर. (कॉर्पोरेट अफेअर्स) म्हणून कार्यरत आहेत. आजवर त्यांचे मनतरंग काव्यसंग्रह, ऊर्मी चारोळी संग्रह, जीवनगाणे ललितलेख संग्रह, कवितेच्या सुरातून हा लेखसंग्रह ही पुस्तके प्रकाशित आहेत.
त्यांचा जीवनगाणे स्तंभ दैनिक कृषीवलमध्ये सलग तीन वर्षे प्रसिद्ध होत होता तर ‘गुदगुल्या’ या राजकीय व सामाजिक वात्रटिका दैनिक पुढारीमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच दैनिक रायगड टाईम्ससाठी ‘बी पॉझिटिव्ह’ या डिजिटल मुलाखतीही प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याचप्रमाणे अनेक दिवाळी अंकांमध्ये त्यांच्या कथा, लेख आणि कविता प्रसिद्ध होत असतात.
त्यांनी माजी विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन म्हणूनही कार्य केले आहे. तसेच आकाशवाणी मुंबई केंद्रावर अर्धा तास स्वरचित काव्यवाचनही केले आहे. ते अलिबाग लायन्स क्लब माजी प्रेसिडेंट असून सध्या ते कोकण मराठी साहित्य परिषद अलिबाग तालुका प्रतिनिधी आणि रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य आहेत. ‘गीत रामायण’ व इतर अनेक कार्यक्रमांसाठी त्यांनी सूत्रसंचालन केले असून ‘गोष्ट तिच्या प्रेमाची’ या मराठी चित्रपटासाठी गीतकार म्हणूनही त्यांनी पदार्पण (गायिका आर्या आंबेकर) केले आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांचा सहभाग असतो व ते अनेक शाळा कॉलेजवर प्रमुख वक्ता म्हणून व अनेक काव्यसंमेलनात कवी म्हणून आमंत्रित असतात.
रमेश धनावडे यांना आजवर रायगड भूषण पुरस्कार, रायगड जिल्हा पत्रकार संघाचा र. वा. दिघे पुरस्कार, कृषीवल कौतुक पुरस्कार, दैनिक पुढारी सन्मान पुरस्कार, म. ना. पाटील साहित्य पुरस्कार, नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार संघ पुरस्कार, स्तंभ विचार परिषद पुरस्कार, सुभानराव राणे प्रतिष्ठान पुरस्कार, साहित्यसंपदा काव्यरत्न पुरस्कार, तेजस्विनी फाउंडेशन कोव्हीड योद्धा पुरस्कार, नवभारत टाईम्स/नवराष्ट्र टाईम्स पुरस्कार, मराठी साहित्य मंडळाचा सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषद प्रथम पुरस्कार असे अनेक पुरस्कार लाभले आहेत.
रमेश धनावडे यांचे असेच काहीतरी हे पुस्तक मराठी साहित्यामधील एक वेगळा प्रकार आहे. “सहज सोपे वाटणारे हे लिखाण चिंतन करण्याजोगे आहे. त्यांनी निर्माण केलेल्या साहित्यात एक गर्भित अर्थ, मिश्किलपणा व ग्राफिटी सारखा प्रकार आपणास अनुभव मिळतो व त्याने रसिक वाचक निश्चितच खुश होतील” असे ज्येष्ठ गझलकार एके शेख यांनी म्हटले आहे. तसेच या पुस्तकाचे उपस्थित सर्व मान्यवरांनी भरभरून कौतुक केले आहे.