सरकारी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा अड्डा बनलंय रोहा; जनतेचा संताप
अमुलकुमार जैन
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात सरकारी भ्रष्टाचाराला ऊत आला असून, भालगाव येथील तलाठी फिरोज मुजावर याला १० हजार रुपयांची लाच घेताना नवी मुंबई अँटी करप्शन विभागाने रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई 6 मे 2025 रोजी करण्यात आली. आता रोह्यातील सरकारी कार्यालये म्हणजे लाचखोरीची दुकाने आणि लोकसेवक म्हणजे जनतेला लुबाडणारे बनले असल्याचा आरोप नागरिकांनधून थेट होत आहे.
मौजे कांडणे येथील शेतजमिनीवरील वारस नोंदीसाठी तक्रारदाराने तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. मात्र तलाठी फिरोज मुजावर याने या कायदेशीर कामासाठी तब्बल १५ हजार रुपयांची लाच मागितली. त्यातील ५ हजार रुपये गुगल पे द्वारे आधीच घेतले होते. उर्वरित १० हजार रुपये घेताना नवी मुंबई अँटी करप्शनच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. पंचसाक्षीदारांच्या उपस्थितीत सापळा यशस्वी झाला.
रोह्यातील सरकारी पदांवरील व्यक्तींकडून लाच मागितली जात असल्याच्या सतत तक्रारी येत आहेत. अनेक अधिकारी विविध कामांसाठी खुलेआम पैसे मागतात. सामान्य माणूस रोज रांगेत उभा आणि हे अधिकारी मात्र बिनधास्त लाचखोरीत व्यस्त अशी परिस्थिती सध्या रोह्यात पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. “हे एक पकडले गेले, बाकीच्यांनाही शोधा आणि जेलमध्ये टाका!”, अशी प्रतिक्रिया रोह्यातून उमटत आहे. लोकांची मागणी आहे की फक्त एकच नव्हे तर सर्वच भ्रष्टाचाऱ्यांवर धडक कारवाई झाली पाहिजे.
पोलीस उप अधीक्षक नितीन दळवी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. त्यात नितीन पवार, गिरासे, योगीराज नाईक, दिपाली सावंत, योगिता चाळके आणि चालक पोलीस हवालदार रतन गायकवाड यांचा सहभाग होता. रोह्यातील अनेक सरकारी कर्मचारी आता “लोकसेवक” न राहता “लाचसेवक” बनले आहेत. जनतेच्या तोंडावर हसून, मागच्या खिशात लाच घालणारे हे अधिकारी सरकारी कार्यालयांच्या इज्जतीवर काळं फासतात. अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालये म्हणजे खाजगी दुकानं केल्याचा अनुभव नागरिकांना दररोज येत आहे.
