• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पुनाडे धरणाची पाणी पातळी खालावली!

ByEditor

May 7, 2025

दहा गावांना होतोय अशुद्ध पाणी पुरवठा, पाणी टंचाईचा धोका!

अनंत नारंगीकर
उरण :
उरण पूर्व विभागातील दहा गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या पुनाडे धरणाची पाणी पातळी वाढत्या उष्णतेमुळे व धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गळतीमुळे खालावली आहे. त्यामुळे रहिवाशांना अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे. तरी या परिसरातील रहिवाशांना शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.

उरणच्या पूर्व विभागातील पुनाडे, वशेणी, कडापे, सारडे, पिरकोण, पाणदिवे,पाले, गोवठणे, आवरे, भंगारपाडा या दहा गावांना पुनाडे धरणामार्फत पाणी पुरवठा केला जातो. पुनाडे धरण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अंतर्गत येत असून नव्याने बांधण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून दहा गावांतील रहिवाशांना आठ गाव पाणी पुरवठा कमिटीच्या देखरेखीखाली पाणी पुरवठा केला जातो. मात्र, धरण परिसरात मुबलक पाऊस झाला तरीही पाणी पातळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गळतीमुळे व वाढत्या उष्णतेमुळे लवकर घसरते. म्हणूनच मार्च, एप्रिल व मे महिन्यात पाणी तळ गाठतो. त्यामुळे या गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.

दोन वर्षांपूर्वी या धरणाचा गाळ काढण्याचे काम करूनही या परिसरातील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यात सध्या धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठल्याने अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे. मात्र या गढूळ पाण्यामुळे गावातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवण्याची संभवना नाकारता येत नाही. सध्या अनेक रहिवासी स्व-खर्चाने कोप्रोली अथवा चिरनेर येथून हेटवणे पाईप लाईनवरून शुद्ध पाणी घेऊन येत आहेत. तरी परिसरातील रहिवाशांना भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी शासनाने या धरणची गळती थांबविण्याचे कामही हाती घ्यावे अशी मागणी होत आहे.

आज आमच्या गोवठणे गावात आम्हाला पाच दिवसांनी पाणी येतो तो तो ही पुरेसा नसून ज्या प्रमाणे शुद्ध पाहिजे त्या प्रमाणे मिलत नाही. त्यामुळे अद्यावत शुद्धीकरण प्रकल्प बसविण्यात आले पाहिजे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे.
-समाधान म्हात्रे
ग्रामस्थ, गोवठणे

पुनाडे धरणात पाणी मुबलक आहे. त्याच्या नियोजनाचे काम दहा गाव कमिटीकडे आहे. आताच पाणी शुद्धिकरणाचे व दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे आणि ज्या कडापे गावात पाणी जात नाही त्या ठिकाणी जलजीवनमधून पाईपलाईन टाकण्याचे काम झाले आहे. लवकरच त्यांनाही पाणी मिळेल.
-नामदेवराव जगताप
उप अभियंता, एमजीपीएल

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!