अमुलकुमार जैन
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील मौजे आगरकोट येथे असलेल्या जागेवर वारस नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाच महिला तलाठी वसुंधरा धोंडू धुमाळ (वय 54, पद – तलाठी, सजा – रेवदंडा, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड (वर्ग-3) रा. रूम क्र. 301, तिसरा मजला, हरितारा सोसायटी, चेंढरे, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड) तर लाचेची उर्वरित राहिलेली पाच हजार रुपयांची रक्कम नंतर देण्यासाठी इशारा करणारा लाचखोर मंडल अधिकारी विजय विश्वनाथ मापुसकर (वय 57, पद – मंडल अधिकारी चौल, रेवदंडा (वर्ग-3) रा. रूम क्र. 10, दुसरा मजला, समर्थ सोसायटी, चेंढरे, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड) या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग रायगडने ताब्यात घेत कारवाई केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांना अखत्यारपत्र दिलेल्या महिलेचे चौल मंडल अधिकारी कार्यालयांतर्गत सजा रेवदंडा हद्दीत असणाऱ्या मौजे आगरकोट येथे सर्व्हे क्रमांक 20/1, 20/2, 21/1, 21/3, 21/4, 23/5 या जमिनीचे सातबारा उताऱ्यावर वारस नोंद करण्याकरिता प्रकरणाची कागदपत्रे जमा करण्यासाठी दि. 5/5/2025 रोजी तक्रारदार आरोपी लोकसेवक विजय विश्वनाथ मापुसकर, मंडळ अधिकारी चौल व तलाठी वसुंधरा धुमाळ यांच्या रेवदंडा येथील कार्यालयात गेले असता दोन्ही लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याशी चर्चा करून प्रत्येकी 5,000/- रुपये अशी एकूण 10,000/- रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार दि. 6/5/2025 रोजी प्राप्त झाली होती. आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने 6/5/2025 रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान दोन्ही लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रत्येकी 5,000/- रुपये अशी एकूण 10,000/- रुपये लाचेची मागणी केल्याचे उघड झाले. त्यानुसार दि. 7/5/2025 रोजी करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी लोकसेवक वसुंधरा धुमाळ, तलाठी यांनी तक्रारदार यांचेकडून मागणी केलेली लाचेची रक्कम रुपये 5,000/- पंच साक्षीदार यांचे समक्ष तक्रारदार यांचेकडून स्वीकारली. तसेच मंडल अधिकारी विजय विश्वनाथ मापुसकर यांनी त्यांच्या लाचेची रक्कम रुपये 5000/- नंतर आणणेबाबत इशारा केला.
तलाठी महिला वसुंधरा धुमाळ या लाचेची रक्कम रुपये 5000/- घेऊन कार्यालयातून निघून जाणार असे तक्रारदार यांच्या लक्षात आल्याने त्यांनी इशारा दिल्याने तलाठी यांना लाचेची रक्कम रुपये 5000/- याच्यासह ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आरोपी लोकसेवक विजय विश्वनाथ मापुसकर यांनी लाचेची मागणी केलेली असल्याने त्यांना देखील पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर कारवाई रायगड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक शशिकांत पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विनोद जाधव, अरुण करकरे, पोलिस हवालदार महेश पाटील, महिला पोलिस हवालदार सुषमा राऊळ, चालक पोलिस शिपाई सागर पाटील यांच्या पथकाने केली आहे.

Asha News madhe…
Lachaluchapat vibhagacha Phone numbet Sudha Det ja.