मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि गेल्या लोकसभा निवडणुकीतील उत्तर मुंबईतील महाविकासआघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनाही आता खिचडी घोटाळ्यात आरोपी बनवण्यात आलं आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटासाठी ही बाब चिंताजनक ठरू शकते. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं सूरज चव्हाण, अमोल कीर्तिकर, सुजित पाटकर यांच्यासह एकूण 8 जणांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहेत. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण कोरोना काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीनं 17 जानेवारी 2024 ला अटक केली होती. या अटेकनंतर फेब्रुवारी 2025 मध्ये त्यांची हायकोर्टाकडून जामीनावर सुटका करण्यात आली.
कोरोना काळात स्थलांतर करणाऱ्या गरीब कामगारांसाठी, ज्यांचे मुंबईत घर नाही, अशा कामगारांसाठी लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला होता. केंद्र सरकारनंही त्याला पाठिंबा दिला होता. त्यानुसार मुंबई महापालिकेनं एकूण 52 कंपन्यांना खिचडी बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. सुरुवातीच्या चार महिन्याच्या काळात चार कोटी खिचडीची पॅकेट्स वाटण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली. याच कामात घोटाळा केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.
एप्रिल ते जुलै 2020 या कालावधीत हा संपूर्ण घोटाळा झाला असून आरोपींनी 14 कोटी 57 लाखांचा घोटाळा केला आहे. कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेकडून दिलेल्या खिचडी वाटप कंत्राटात मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार झाल्याचा आरोप झाला होता. या आरोपानंतर दोन वर्षांपूर्वी गोपाळ पांडुरंग लावणे यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं आयपीसी कलम 406, 420, 465, 468, 471, 120 बी, 34 या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत वैष्णवी किचन, सह्याद्री रिफ्रेशमेंट, फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसशी संबंधित संचालकांसह कंपनीशी संबंधित आठ जणांची चौकशी झाली होती. फोर्सवन मल्टी सर्व्हिसेसचे मालक आणि सध्या शिवसेना शिंदे गटात असलेले संजय माशिलकर, प्रांजल माशिलकर व प्रीतम माशिलकर यांनी संगनमतानं स्नेहा कॅटरर्सचे संजय माळी यांच्याकडून खिचडी बनवून घेतली. मात्र, खिचडी वाटप योजनेकरीता पात्र नसल्याचं माहिती असताना सूरज चव्हाण आणि अमोल कीर्तिकर यांच्या मदतीनं हे खिचडी वाटपाचं कंत्राट मिळविलं आणि यासाठी बनावट दस्तावेज वापरले, असा आरोप आर्थिक गुन्हे शाखेनं केला आहे.
कोरोना काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी आधी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सूरज चव्हाण आणि अमोल कीर्तिकर यांची चौकशी केली होती. त्यानंतर सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास ईडीकडे असून अमोल कीर्तिकर यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. प्रत्येक पॅकेटमध्ये कमी खिचडी भरल्याचे पुरावे जरी नसले तरी कंत्राट मिळवताना मुंबई महानगरपालिकेची फसवणूक केल्याचं स्पष्ट आहे. तसंच आरोपींचा हे कंत्राट मिळवताना पहिल्यापासून शेवटपर्यंत सहभाग असल्याचे पुरावे असल्याचंही कोर्टानं यापूर्वी मान्य केलेलं आहे. खिचडी कंत्राटाच्या 3.64 कोटी रूपयांपैकी 1.25 कोटी रूपये सूरज चव्हाणच्या वैयक्तिक खात्यात तर 10 लाख रूपये अन्य कंपनीच्या खात्यात जमा केल्याचा आरोप ईडीनं केला आहे. या प्रकरणी आपल्याकडे पुरावा असल्याचा दावाही ईडीनं कोर्टात केला आहे.
