वाशी, लांढर, बोरघर, तळाघर पाठोपाठ निवीकर सुखावले
शशिकांत मोरे
धाटाव : आंबेवाडी ते निवी कालव्याचे पाणी अखेर निवी हद्दीत शेवटच्या टप्प्यात आले. एक तपानंतर हा दुर्मिळ योग आला. पुढील डिसेंबर हंगामापासून कालव्याचे पाणी पूर्वापार राहील हाच आनंद द्विगुणीत करण्यासाठी शनिवारी निवी येथे कालव्याच्या पाण्याचा जलपूजन सोहळा दिमाखात पार पडला. पर्यावरण प्रेमी, रोहा असो.चे अध्यक्ष उद्योगपती पी. पी. बारदेशकर यांच्या हस्ते जलपूजन करून श्रीफळ वाढविण्यात आले.
खूप वर्षानंतर कालव्याला पाणी आले, बळीराजाची पाण्याची प्रतीक्षा संपेल, परिसर पूर्वीसारखा सुजलाम् सुफलाम् झालेला पाहायला मिळणार आहे. बळीराजा सुखावेल अशी भावना बारदेशकर यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, बळीराजा फांऊडेशनच्या कालव्याच्या पाणी लढ्याला मोठे यश आले. खा. सुनील तटकरेंनी कालव्याच्या कामांची दुरुस्ती, घेतलेला आढावा, केलेल्या सूचनांनी प्रयत्नांना अधिक बळकटी मिळाली हे अधोरेखीत झाले आहे. तर कालव्याची उर्वरित कामे लवकरच मार्गी लागावीत, पावसानंतर तातडीने कामे पूर्ण करून डिसेंबर हंगामात कालव्याचे पाणी सोडण्याचे प्रयत्न क्षमतेने राहतील असा ईशारा बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी यावेळी दिला आहे.
निवी येथील प्रवेशद्वार कालवा घाटावर जलपूजन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी उद्योजक पी. पी. बारदेशकर, सिटीझन फोरमचे अध्यक्ष आप्पा देशमुख, कृषी मंडळ अधिकारी अमोल सुतार, सिटी ऑफ फ्लाॅवर्सचे संपादक सुरेंद्र निंबाळकर, माजी सरपंच अमित मोहिते, बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, संस्थापक राजेंद्र जाधव, सचिव ॲड. दीपक भगत, लक्ष्मण मोहिते, नरेश पडवळ, गणेश राऊत, राकेश बामुगडे, रुपेश साळवी, प्रशांत राऊत, योगेश राऊत, नथुराम बामूगडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रारंभी उद्योजक पी पी बारदेशकर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आले. यावेळी कालव्याची दुरुस्ती कामे, पाण्यासाठी पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी जाणिवेतून सहयोग दिला. त्यासाठी प्रतिनिधीक म्हणून पाण्यासाठी तळमळीचे निरीक्षक निलेश दिसले यांच्या शेतकरी ग्राम सन्मान उद्योजक पी. पी. बारदेशकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान, बळीराजा फांऊडेशनने कालव्याच्या पाण्यासाठी अविरत लढा दिला, चिकाटी कायम ठेवली त्याचा हा जलपूजन सोहळा साजरा करीत आहोत, अशी कौतुकाची थाप मान्यवरांनी दिली तर कालव्याला पाणी आल्याने वाशी, लांढर, बोरघर, तळाघर पाठोपाठ निवीकर सुखावून गेले हेच ठळकपणे नमूद झाले आहे.
