रायगड : देशभरात विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या आगरी समाजातील साधू-संतांचे पहिले भव्य-दिव्य “राष्ट्रीय अध्यात्म संमेलन” येत्या रविवारी, १८ मे २०२५ रोजी मोठ्या जल्लोषात संपन्न होणार आहे. प. पु. बाळयोगी सदानंद महाराज, जगद्गुरू पुरुषोत्तमानंद पुरी महास्वामी आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तर समाजाचे ९ आमदार, २ खासदार, शेकाप नेते जयंत पाटील, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, स्थानिक खासदार धैर्यशील पाटील, उद्योगपती जे. एम. म्हात्रे, मीठ उत्पादक जाती फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीराला सागर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील ह.भ.प. अंबादास कारंडे, ह.भ.प. एकनाथ सांगोलकर, ह. भ.प. जगन्नाथ पाटील यांना निमंत्रित केले आहे. या ऐतिहासिक सोहळ्यात विशाल जनसमुदायाच्या साक्षीने अध्यात्म क्षेत्रातील योगदानाबद्दलचे विविध राष्ट्रीय पुरस्कार देखील प्रदान केले जाणार आहेत.
परिषदेत देशभरातून जवळपास ८ ते १० हजार भाविक-भक्त तसेच समाज बंधू -भगिनी सहभागी होणार आहेत. सुरुवातीला दुपारी ३ वाजता पेण शहरातून निघणार असलेली भव्य शोभायात्रा ( नगरप्रदक्षिणा) आकर्षणाचं केंद्रूबिंदू ठरणार आहे. यामध्ये शेकडो भजनी मंडळ, हरिपाठ मंडळ, वारकरी मंडळ, विविध संस्था -संघटना, महिला मंडळ सहभाग घेणार असल्याने ही परिषद अभूतपूर्व होणार आहे
देशातील पंधराहून अधिक राज्यात वास्तव्य करुन असलेल्या १० ते १२ कोटींच्या संख्येच्या आगरी समाज व त्याच्या पोटजाती, उपजाती आणि तत्सम मीठ उत्पादन करणाऱ्या जातींतील सिध्द महापुरुषांच्या पदस्पर्शाने श्रींची माहेरघर असलेली पुण्यनगरी पावन होणार आहे. “एक दिवस समाजासाठी” या टॅग लाईनखाली अखिल भारतीय आगरी समाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी समाजाला आवाहन केल्याने समाजामध्ये प्रचंड उत्साह पहायला मिळत आहे. हे चित्र पाहता यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने एकवटणार असल्याच्या विश्वास समाजातून व्यक्त होत आहे.
