• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

गोवे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य, ठेकेदाराच्या मनमानी

ByEditor

May 10, 2025

विश्वास निकम
कोलाड :
रोहा तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरुन गोवे गावाकडे जाणारा ५०० मिटरचा रस्ता ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे रखडला असुन तीन ते चार दिवस पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे या मार्गावरून येणारे जाणारे विद्यार्थी, कामगार वर्ग, प्रवाशी नागरिक यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असुन यामुळे एखादा मोठा अपघात झाला तर संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरण्यात येईल अशी संतप्त प्रतिक्रिया गोवे ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील पुई हद्दीतील महिसदरा नदीवरील नवीन पुलाचे काम सुरु आहे. या मार्गावरून या पुलाच्या बाजूनी गोवे गावाकडे जाणारा ५०० मिटरचा रस्ता मुंबई गोवा हायवेच्या कामामुळे रखडला आहे. तसेच पावसाळा जवळ आला तरी गोवे गावाकडे जाणारा रस्ता ठेकेदाराच्या आडमुठे धोरणामुळे अद्यापही पूर्ण होऊ शकला नाही.

मुंबई गोवा महामार्ग ६६ वरील चौपदरीकरणाच्या कामाला १७ वर्षे पूर्ण झाल्यानंतर कोलाड परिसरातील रस्ता करण्यासाठी ठेकेदाराला जाग आली आहे. तर हे काम कोणत्याही ग्रामस्थांचा विचार न करता ठेकेदाराच्या मनमानीनुसार सुरु आहे. रस्त्यावर भराव टाकण्याचे काम सुरु आहे परंतु या भरावामुळे मुंबई-गोवा महामार्गावरून गोवे गावाकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद केला आहे. याविषयी गोवे ग्रामस्थ यांनी आंदोलन केले होते. यानंतर हा रस्ता लवकरच लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन संबंधित ठेकेदार यांनी गोवे ग्रामस्थांना दिले होते. परंतु पावसाळा सुरु होण्यासाठी १५ ते २० दिवस शिल्लक राहिले असतांना रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी किती जागा संपादीत करण्यात आली आहे. याची माहिती घेऊन पूर्ण भराव केला पाहिजे होता. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरुन असंख्य गावाकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला असता. परंतु नियोजन शुन्य कामामुळे लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत गोवे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र मुंबई गोवा हायवेच्या चौपदरीकरणासाठी संपादीत करण्यात आलेल्या जागेमुळे गोवे गावाकडे जाणारा ५०० मिटरचा रस्ता रखडला आहे. तीन ते चार दिवसापासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले. यामुळे दुचाकी घसरून पडत आहेत. पावसाळ्यात काय परिस्थिती निर्माण होईल हे सांगता येत नाही. यामुळे एखादा मोठा अपघात घडला तर याला संबंधित ठेकेदार जबाबदार असेल. या रस्त्याचे काम पावसाळ्या अगोदर पूर्ण करावे अन्यथा गोवे ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल.
-नरेंद्र तानाजी जाधव
विभागीय अध्यक्ष

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!