सलीम शेख
माणगाव : तालुक्यातील निजामपूर विभागातील मौजे येरद येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञातांनी ७० वर्षीय वृद्ध महिलेला मारहाण केली. मारहाणीत या महिलेचा मृत्यू झाला.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. १० मे रोजी सकाळी ७.४५ वा. ते ११.४५ च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी मनोहर मोकाशी (रा. येरद) यांच्या घरामध्ये जबरी चोरीच्या उद्देशाने प्रवेश करून फिर्यादी यांच्या पत्नी संगीता मनोहर मोकाशी (वय ७०) यांना जबर मारहाण करून त्यांच्या गळ्यातील, कानातील, हातातील असे एकूण ३८,४०० रुपये किमतीचे दागिने चोरून महिलेला जबर दुखापत केली. या दुखापतीत संगीता मोकाशी यांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक रायगड अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण रायगडचे बाळासाहेब खाडे, पो. नि. माणगाव निवृत्ती बोऱ्हाडे, स. पो. नि. नरेंद्र बेलदार, पोलिस उपनिरीक्षक विकास चव्हाण यांच्यासह श्वान पथक, अंगुलीमुद्रा, फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी भेट दिली. या घटनेची नोंद माणगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. निवृत्ती बोऱ्हाडे करीत आहेत.
