जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा आढावा व स्पर्धेचे करणार उद्घाटन
क्रीडा प्रतिनिधी
रायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार सोमवार, दिनांक १२ मे रोजी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या प्रीमियर लीग स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी व जिल्हा क्रिकेट असोसिएशनची आढावा बैठक घेण्यासाठी येत आहेत.
दुपारी १२.३० वाजता पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर एमसीए आयोजित सोळा वर्षाखालील आंतरजिल्हा क्रिकेट सामन्याला भेट देणार असून तिथे रोहित पवार यांचे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी.२.३० वाजता शरद पवार भवन पेण नगरपरिषद हॉल येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र प्रीमियर लीग व महाराष्ट्र वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेविषयी पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता उलवे येथील रामशेठ ठाकूर क्रिकेट मैदान शिवाजीनगर येथे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यात प्रामुख्याने लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रवीशेठ पाटील, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र दळवी, आमदार विक्रांत पाटील, कामगार नेते महेंद्र घरत, माजी आमदार अनिकेत तटकरे, पनवेल महानगरपालिकेचे गटनेते परेश ठाकूर, पेण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील व सिडकोचे संचालक गणेश देशमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सदरच्या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व अकॅडमी क्लबच्या क्रिकेट खेळाडू, पंच, प्रशिक्षक व क्रिकेटप्रेमी लोकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक यांनी केले आहे.
