गावातील महिलेला घरात शिरून मिठी मारीत केला विनयभंग
अमुलकुमार जैन
अलिबाग : राज्यातील सत्ताधारी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकारी याच्या वाहन चालकाने अलिबागपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गावातील महिलेच्या घरात कोणीही नसताना शिरून महिलेला मिठी मारीत विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अलिबागपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एका गावात आरोपी प्रसाद अरुण भगत हा दि. १० मे २०२५ रोजी रात्री साडे आठच्या सुमारास छत्तीस वर्षीय पीडित महीला हिची मोठी मुलगी ही कामावर गेलेली असताना तसेच लहान मुलगी ही शेजाऱ्याकडे खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी प्रसाद अरुण भगत याने संधीचा फायदा घेत घरात प्रवेश केला. त्यावेळी पीडित महीला ही भांडी घासत असताना मागून येऊन कमरेला मिठी मारीत विनयभंग करीत लैंगिक अत्याचार केला. यावेळी पीडित महिला ही त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी प्रयत्न करीत असताना आरडाओरडा केला म्हणून आरोपी प्रसाद भगत याने पीडित महिलेच्या कानाखाली मारली व पळ काढला.
केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभागी असणाऱ्या एका राजकीय पक्षाच्या पदाधिकारी याच्या चालकाने केलेला प्रताप पाहून स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सत्तेतल्याच पदाधिकारी असलेल्या नेत्याच्या चालकाकडून महिलेचा विनयभंग करण्याचा प्रकार घडल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर होऊ लागला आहे. या घटनेनंतर अलिबाग पोलीस ठाण्यात चालकाविरोधात रात्री अकरा वाजून बत्तीस मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक मराठे हे करीत आहेत.
