विनायक पाटील
पेण : भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेणमधील मोसीन मुजावर या युवकाने देशविरोधी आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट सोशल मीडियावर वायरल केली होती. यामुळे पेणमधील सर्व धार्मियांनी मोसीन मुजावर याच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. यावेळी मोर्चे ही निघाले होते. या प्रकरणी आरोपी मोसिन मुजावर याला पोलिसांनी नवी मुंबईतील तुर्भे रेल्वे स्टेशन येथून सोमवारी (१२ मे) पहाटे अटक केली आहे.
मोसिन मुजावरने ३ एप्रिल रोजी इन्स्टाग्रामवरून “इंडिया के रुल्स की तहेस नहेश हो गई है, संभलके रहो हमारे पास तो तलवारे, बॉम्ब, मिसाईल सब रेडी है, देख रहा है ना इराण सब लेके बैठा है जो भी मुस्लिम को तकलीफ देगा एक मिनिट मे उडा देगा वो, एक दिन इंडिया भी हमारा होगा, पूरा कब्जा हमारा होगा, और हम मस्त दबा के मारेंगे” असे देशाविरुद्ध चिथावणीखोर वक्तव्य करत भारताविरोधात मजकूर पोस्ट केला होता. यामुळे पेण शहरात धार्मिक तेढ निर्माण होण्याची भीती निर्माण झाली होती.या पोस्टनंतर आयुष किरण शहा यांनी सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष साईराज कदम यांच्या माध्यमातून ९ मे रोजी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी पोस्टची पडताळणी करून मोसिन मुजावर विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३५३(१) (ख) व ३५३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पेण पोलिसांनी पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समद बेग आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल अजिंक्य म्हात्रे, अमोल म्हात्रे, सुशांत भोईर, संतोष जाधव, राजा पाटील, प्रकाश कोकरे, सचिन वासकोटी, गोविंद तलवरे आदींच्या टीमने तांत्रिक विश्लेषणाद्वारे मोसिनचा माग काढून त्याला तुर्भे येथून ताब्यात घेतले असून पुढील तपास पेण पोलिसांनकडून सुरु आहे.
