• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

खोपटा पुलाला भगदाड; सा. बां. विभागाची तात्पुरती उपाययोजना

ByEditor

Aug 5, 2023

कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक

घन:श्याम कडू
उरण :
सततच्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे जुन्या खोपटा पुलाला भगदाड पडल्याची घटना शुक्रवारी (दि. ४) रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखून सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता नरेश पवार यांनी तातडीने सदर खोपटा पुलाची पाहणी करून पुलावरील भलामोठा खड्डा भरला आहे. परंतु सदरचे भगदाड हे दगडमातीने भरले असल्याने पुलावरून प्रवास करताना चालकांनी सावधानता बाळगून प्रवास करावा. पुलाच्या क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेच्या अवजड वाहनांची वाहतूक शासकीय यंत्रणेच्या कृपाशीर्वादाने होत असल्यानेच पूल कमकुवत होत चालला असल्याचा आरोप स्थानिक जनता व वाहन चालकांकडून केला जात आहे. सदर पडलेल्या भगदाडावर प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी अन्यथा पावसामध्ये पुन्हा भगदाड पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उरण पुर्व विभागाला उरण शहराशी जोडणाऱ्या खोपटा पुलाची उभारणी ही राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी केली होती. या खोपटा (जुन्या) पुलावरून प्रवाशी वाहनाबरोबर २० ते ३० टन क्षमतेच्या अवजड वाहनांची वर्दळ होऊ शकते असे आवाहन उरण तहसील व सार्वजनिक बांधकाम विभाग उरणकडून सातत्याने करण्यात आले आहे. परंतु जुन्या खोपटा पुलावरून मोठ्या प्रमाणात ६० ते ८० टन क्षमतेच्या मालानी भरलेल्या जड-अवजड वाहनांची वाहतूक ही सर्व शासकीय यंत्रणेच्या संगनमताने राजरोसपणे सुरू आहे. याचा त्रास हा जुन्या खोपटा पुलाबरोबर प्रवास करणाऱ्या विद्यार्थी व प्रवाशी नागरिकांना सहन करून वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत आहे.

जुन्या खोपटा पुलावरील सततच्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे शुक्रवारी ( दि. ५) पुलावर भगदाड पडल्याची घटना घडली आहे. प्रवाशी नागरिकांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली आहे. या घटनेची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग उरणचे उप अभियंता नरेश पवार यांना मिळताच त्यांनी खोपटा पुलाची पाहणी करून सदर भला मोठा खड्डा दगडमातीने भरला आहे. त्यामुळे जरी धोका टळला असला तरी या पुलावरून वाहतूक करताना वाहनचालकांनी विशेषतः मोटारसायकलस्वारांनी सावधानता बाळगूनच प्रवास करणे हिताचे ठरणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!