एमसीएकडून ७५ लाखांचे अनुदान
क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या टी-२० प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्ह्याचे लोकनेते, माजी खासदार रामशेठ ठाकूर, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार, कामगार नेते महेंद्र घरत, माजी आमदार अनिकेत तटकरे, आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, एमसीए अपेक्स कौन्सिलचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य यांच्या उपस्थितीत उलवे येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर करण्यात आले.
यावेळी रायगडचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना जिल्ह्यात क्रीडांगणाची कमतरता असल्याची खंत व्यक्त केली. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनला स्वतःच्या हक्काचे मैदान मिळावे ह्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत, मैदानासाठी जागा उपलब्ध करून आपण क्रीडांगणाच्या निर्माणासाठी एक कोटी रुपयांची मदत करणार असल्याचे जाहीर केले.

एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना प्रत्येक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मैदानाच्या विकासाठी ७५ लाखांचे अनुदान एमसीए देणार असल्याचे सांगितले. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनची नवनिर्वाचित कमिटी अनिरुद्ध पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोमाने काम करत असल्याचा आपल्याला आनंद होत आहे. जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने चालू हंगामात २८० सामन्यांचे आयोजन केल्याने प्रत्येक वयोगटातील मुलामुलींना खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. तसेच रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनने एमसीए प्रमाणित पंच व गुणलेखक तयार केल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रोफेशनल क्रिकेटचा प्रसार होणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमप्रसंगी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध वयोगटातील स्पर्धेच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यावेळी रायगड जिल्ह्यातील खेळाडू व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
