ना . आदिती तटकरे यांच्या हस्ते माणगांवात हिरकणी कक्षाचे उदघाटन
सलीम शेख
माणगाव : ज्या ज्या वेळी देशावर संकट येत त्या त्या वेळी भारतीय सैनिक नेहमी पुढे उभे असतात. सैनिकांसाठी प्रथम देश नंतर कुटूंब असत. सैनिक आपल्या कुटुंबाचा विचार न करता सीमेवर आपलं संरक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेत असतात. त्याच्यामुळे आपलं स्वातंत्र्य टिकून आहे. सैनिकांमुळेच आपण शांतपणे श्वास घेऊ शकतो असे महिला व बालकल्याण मंत्री ना. आदिती तटकरे यांनी दि. ५ ऑगस्ट रोजी माणगांव तहसील कार्यालय येथे झालेल्या ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ झालेल्या कार्यक्रमात प्रतिपादन केले.

यावेळी ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते ‘हिरकणी कक्ष’ व तहसील कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्यांसाठी अभ्यंगत कक्षाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, तहसीलदार विकास गारुडकर, अप्पर तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीनकुमार पोंदकुले, पो. नि. राजेंद्र पाटील, माजी सैनिक, सैनिक विरपत्नी, मा. ता. रा. कॉ. अध्यक्ष सुभाष केकाणे, महिला तालुकाध्यक्षा संगीता बक्कम, महाड-माणगांव विधानसभा अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक आनंद यादव, पंचायत समिती माजी सदस्य शैलेश भोनकर, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, उणेगाव माजी सरपंच राजेंद्र शिर्के, महिला आघाडी तालुका उपाध्यक्षा श्रद्धा यादव, विळे सरपंच गजानन मोहिते, शहर अध्यक्षा योगिता चव्हाण, इकबाल हर्णेकर, नगरसेवक व नगरसेविका, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच माणगांव महसूल विभाग अंतर्गत मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.
यावेळी देशासाठी बलिदान दिलेल्या माजी सैनिक वीर पत्नींचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सैनिक सेवेत कार्यरत असलेल्या व सेवा निवृत्त झालेल्या माजी सैनिकांची कोणतीही कामे व अडचण असल्यास ती तात्काळ प्रामुख्याने सोडविण्यात येतील असे प्रांताधिकारी संदिपान सानप व तहसीलदार विकास गारुडकडर यांनी सांगितले. त्यांच्यासाठी कोणतेही प्रतीक्षा कक्ष नसेल त्यांनी थेट आमच्या दालनात येऊन आपल्या व्यथा सांगाव्यात त्वरित त्यांची कामे केली जातील. माणगांव येथे जीर्ण अवस्थेत असलेल्या सैनिक विश्रामगृहाच काम लवकरात लवकर करण्यात येईल असे आश्वासन देखील ना. आदिती तटकरे यांनी यावेळी दिले.