अमुलकुमार जैन
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या मोहोत गावात श्याम सिताराम भिसे याने राहत्या घराशेजारील परसबागेत अमली पदार्थाच्या गांजा या पिकाची लागवड केली असल्याची घटना ताजी असतानाच रायगड पोलिसांकडील श्वान पथकाच्या सहाय्याने अलिबाग तालुक्यातील रेवदंडा परिसरातील थेरोंडा फाट्याजवळ लाखों रुपयांच्या गांजासहित मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अर्चना आशिष तळेकर (वय ४१) आशिष नंदकुमार तळेकर (वय ५०, दोघे रा. थेरोंडा फाट्याजवळ रेवदंडा, तालुका-अलिबाग, रायगड) या दोघांच्या विरोधात भाग्यश्री जयंत पाटील (महिला पोलिस हवालदार स्थानिक गुन्हे आन्वेषण शाखा, रायगड अलिबाग) यांनी रेवदंडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अलिबाग तालुक्यातील रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीतील मौजे थेरोंडा फाट्यानजिक अर्चना आशिष तळेकर व आशिष नंदकुमार तळेकर यांच्या निवासस्थानी व त्यांच्या मालकीच्या स्वामी माउली कॉटेज येथे दि. २६ मे २०२५ रोजी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र दौंडकर यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम, भास्कर जाधव, महिला पोलिस हवालदार भाग्यश्री पाटील, पोलिस हवालदार अक्षय जाधव, सचिन शेलार, वावेकर आणि पोलिस श्वान पथक यांच्याकडील रुफस श्वान यांनी छापा टाकला. या पथकाने रविवारी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास थेरोंडा फाटा येथे तळेकर यांच्या घरी आणि त्यांच्या मालकीच्या स्वामी माऊली कॉटेजवर छापा टाकला. या छाप्यात मानवी शरीरावर परिणाम करणारा गांजा, अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्रीसाठी ठेवला असल्याचे दिसून आले. त्यामध्ये सात किलो 672 ग्रॅम वजन असलेले एक लाख 51 हजार रुपये किंमतीचा गांजा तसेच एक हजार रुपये किंमतीचा वजन काटा, पिशव्या, स्टॅपलर असा एकूण १ लाख ५२ हजार रुपये किंमतीचा साठा ताब्यात घेण्यात आला आहे. अर्चना तळेकर व अशिष तळेकर यांच्याविरोधात रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उप निरीक्षक शिवकुमार नंदगावे करीत आहेत.